चिपळूण पोलीस स्थानकात पती व सासू यांच्यावर गुन्हा
चिपळूण (प्रतिनिधी) : मारहाणीची तक्रार पोलीस स्थानकात देण्यासाठी जात असताना विवाहित महिलेला तिच्या पती व सासूने मारहाण केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील कौंढरताम्हाणे येथे बुधवार दि. २९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये ती महिला जखमी झाली असून याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात पती व सासू या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपेश शिवाजी भोबस्कर (२८), श्रध्दा शिवाजी भोबस्कर (६५, दोघेही रा. कौंढरताम्हाणे) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर याबाबतची फिर्याद मनाली दिपेश भोबस्कर (२८, रा. कौंढरताम्हाणे) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनाली भोबस्कर यांना दि. २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मारहाण झाली होती. या मारहाणीबाबतची तक्रार देण्यासाठी त्या आपल्या लहान मुलासह बुधवार दि. २९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर निघाल्या. मात्र याचवेळी त्यांचा पती दिपेश भोबस्कर याने त्यांना अडवून तू मुलाला घेऊन जाऊ नकोस, त्याला कोठेही घेऊन जाऊ देणार नाही असे म्हणत मुलगा आयांश तिच्यासोबत पाठवले नाही. त्यानंतर मनाली या घराबाहेर पडून रस्त्यावर आल्या. याचवेळी दिपेश याने घराच्या बाहेर ठेवलेली बांबूची काठी घेऊन येत मनाली यांना मारहाण व शिवीगाळीही केली. त्याचवेळी श्रध्दा भोबस्कर या सुध्दा तिथे आल्या व त्यांनीही मनाली यांचे केस पकडून हाताचे थापटाने मारहाण केली. यामध्ये मनाली भोबस्कर या जखमी झाल्या. त्यांच्या फिर्यादीवरून चिपळूण पोलीस स्थानकात पती व सासू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.













