पंचायत राज संस्था आणि समुदाय-आधारित संस्थांच्या अभिसरणावर महत्त्वपूर्ण मंथन
सावंतवाडी । प्रतिनिधी : ‘उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ आणि ‘कुटुंबश्री केरळ NRO’ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या पंचायत राज संस्था – समुदाय-आधारित संस्था अभिसरण प्रकल्पांतर्गत श्री सद्गुरू साटम महाराज महिला प्रभागसंघ, आंबोली ची प्रभागस्तरीय मूल्यांकन कार्यशाळा आज दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी दाणोली केंद्र शाळा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला, कामाचे मूल्यांकन करण्यात आले आणि भविष्यातील कृतीची दिशा निश्चित करण्यात आली.
या महत्वपूर्ण कार्यशाळेस विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यात सातूंळी बावळाट गावच्या सरपंच सौ. सोनाली परब,
आंबोली गावच्या सरपंच सौ. सावित्री पालेकर, गेळे गावचे उपसरपंच श्री. गवस, तालुका अभियान कक्षातून (BMM) श्रीमती स्वाती रेडकर
कुटुंबश्री केरळ NRO च्या मेंटॉर गिरिजा संतोष, DRP श्रावणी वेटे आणि BRP प्राची राऊळ या सर्वांनी उपस्थित सदस्यांना मोलाचे मार्गदर्शन करत प्रभागसंघाच्या आतापर्यंतच्या कार्याचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यशाळेत प्रभागसंघाच्या कार्यकारी समितीचे (EC) सदस्य, प्रभाग समन्वयक गजानन उत्तम राठोड, संघ व्यवस्थापक सौ. मंजिरी बांदेकर, सर्व कार्यरत LRP (लोकल रिसोर्स पर्सन) आणि CRP (कम्युनिटी रिसोर्स पर्सन) ताई व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गरीब आणि वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, ग्रामपंचायत आणि महिलांचे संघटन यांच्यात समन्वय साधून ग्रामीण विकास अधिक प्रभावी करणे, हा या PRI-CBO अभिसरण प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. कार्यशाळेत या उद्देशांवर आणि ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या कामांवर विस्तृत चर्चा झाली.
या मूल्यांकन कार्यशाळेमुळे प्रभागसंघाचे काम अधिक मजबूत होऊन स्थानिक प्रशासनात महिलांचा आणि समुदायाचा सहभाग वाढण्यास मदत मिळणार आहे. उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे आणि कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यशाळेची यशस्वी सांगता झाली.









