सातुळी-बावळाटचे माजी उपसरपंच प्रशांत सुकी यांच्यासह उबाठा कार्यकर्ते भाजपात

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांच्या माध्यमातून पक्ष प्रवेश 

सावंतवाडी : सातुळी-बावळाट ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रशांत सुकी यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ओरोस येथील भाजप जिल्हा कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.

सातुळी बावळाट माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असलेले प्रशांत सुकी यांच्या भाजप प्रवेशामुळे सातुळी-बावळाट परिसरात भाजपची ताकद वाढण्यास मदत मिळणार आहे.

यावेळी बोलताना श्री. सुकी म्हणाले, “भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून यापुढे पक्ष संघटना वाढीसाठी सदैव कार्य करत राहू. तसेच, जनतेच्या हिताचे कार्य करण्यासाठी कायम कटिबद्ध व प्रयत्नशील राहू. भाजपा पक्ष हा शिस्तीचा आणि पक्ष संघटनेच्या ध्येय-धोरणांशी सदैव एकनिष्ठ असलेला पक्ष आहे. त्यामुळे अशा पक्षामध्ये काम करणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.”

यावेळी प्रशांत सुकी यांच्यासोबत माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल बांदेकर, ॲड. सुमित सुकी, अजिंक्य सुकी, हर्षवर्धन सुकी, प्रसाद सुकी, अमर मोर्ये, केतन उर्फ बंटी अजगावकर, आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

या पक्ष प्रवेश सोहळ्याला जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, आंबोली मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, सुधाकर सुकी, चौकूळ सरपंच गुलाबराव गावडे, गेळे सरपंच सागर ढोकरे, शक्तिकेंद्र प्रमुख भिवा सावंत, ॲड. विठ्ठल परब, केसरी विकास सोसायटी संचालक दिप्तेश सुकी, निहाल शिरसाट, आदी मान्यवर उपस्थित होते.