देवदर्शनाला गेलेल्या व्यापाऱ्याचा हद्यविकाराने मृत्यू

गुहागर प्रतिनिधी
गिरनार (गुजरात) येथे देवदर्शनासाठी गेलेल्या गुहागर
तालुक्यातील शृंगारतळी येथील तरुण व्यापाऱ्याचा पायऱ्या चढताना जागीच
कोसळून हद् यविकाराने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शनिवारी सकाळी 6
वाजताच्या सुमारास घडली. या दुदैवी घटनेने शृंगारतळी बाजारपेठेसह
तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

गुहागर तालुक्यातील बहुसंख्य तरुण गिरनार येथे शुक्रवारी संध्याकाळी
देवदर्शनासाठी गेले होते. शृंगारतळी बाजारपेठेतील प्रतिष्ठीत व्यापारी
रविंद्र स्टोअर्सचे मालक प्रसाद उर्फ बाळा रविंद्र संसारे (वय 46, मु.पो.
जानवळे, ता. गुहागर) हा तरुणदेखील गिरनारला गेला होता. शनिवारी सकाळी 6
वाजताच्या सुमारास 600 पायऱ्या चढून झाल्यावर तो जागीच कोसळला आणि तेथेच
त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती त्याच्यासोबतच्या मित्रांनी
शृंगारतळीत त्याच्या नातेवाईकांना कळवली. हे वृत्त कळताच अनेकांनी शोक
व्यक्त केला. प्रसाद संसारे यांचा मृतदेह रविवारपर्यंत शृंगारतळी येथे
आणण्यात येईल, असे त्यांच्या नातेवाईकांकडून समजले. प्रसाद हा सर्व
तरुणांमध्ये मनमिळावू वागणारा व चांगल्या स्वभावाचा होता. त्याच्या
पश्चात पत्नी, आई-वडील, भाऊ, एक मुलगी व मुलगा असा परिवार आहे.