क्रीडांगण अबाधित राखून ‘ब्ल्यू फ्लॅग’ अंमलबजावणी व्हावी

गुहागर/प्रतिनिधी :
समुद्रकिनाऱ्यावरील नियोजित ब्ल्यू फ्लॅग मानांकनातून शहराचा विकास होत असेल तर क्रीडांगण अबाधित राखून ब्ल्यू फ्लॅग व्हावे, अशी मागणी शुक्रवारी भंडारी भवन येथे आयोजित बैठकीत शहरवासियांनी केली. ब्ल्यू फ्लॅग मानांकनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आयोजित केलेल्या या बैठकीला मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण उपस्थित होते.

या बैठकीत शहरवासियांनी अनेक विषय हाताळले. शहरासाठी एकमेव क्रीडांगण असून ते अबाधित राखून सदर मानांकनाचे काम सुरू रहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी नगरपंचायत डीपी मधील आरक्षण, रस्ता रुंदीकरण यावरही चर्चा झाली. मात्र याबाबत कोणाचा आक्षेप असल्यास डीपीच्या अंतिम मंजुरी करता आपणाकडून हरकतींसठी मुदत दिली जाईल. त्यावेळी शहरवासियांनी आपल्या समस्या व हरकती लेखी स्वरुपात मांडाव्यात, मुख्याधिकारी चव्हाण यांनी स्पष्ट केले.

ब्ल्यू फ्लॅगमध्ये कोणाची खासगी जागा जात नाही. आपले क्रीडांगणाबाबतचे निवेदन जिल्हाधकाऱ्यांना द्यावे. मात्र पर्यटकांसाठी समुद्रकिनारी शौचालय, वॉटर
आहेत. एटीएम, छोट्या-मोठ्या व्यवसायकांसाठी व्यवस्था, शुद्ध पाणी, सुरक्षारक्षक अशा सुविधा उभारल्या जाणार याबाबतचा वरिष्ठ कार्यालयातून आदेश आल्यानंतर आपण काम सुरू ठेवले आहे. यामुळे गुहागरला एक चालून आलेली संधी असल्याचे मुख्याधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

ब्ल्यू फ्लॅगच्या माध्यमातून कोणकोणत्या सुविधा आवश्यक आहेत हे नगरपंचायतीला कळवावे. शहरातील गुहागर-वेलदूर रस्ता रुंदीकरण नको असेल तर पर्यायी रस्ता सुचवणे आवश्यक आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहराचा विकास साधण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करुया, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

यावेळी अॅड. संकेत साळवी यांनी ब्ल्यू फ्लॅग बाबतची प्रशासनाची भूमिका आणि शहरवासियांनी आपली स्थानिक संस्कृती अबाधित राखून कशा सुविधा निर्माण करुन घेता येईल यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत आवश्यक नगरपंचायतीकडे सादर कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.