आंबेरी येथे काजू पीक शेती शाळेस प्रतिसाद!

मसुरे | झुंजार पेडणेकर : आंबा व काजू पिकाचे तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी फलोत्पादन पिकावरील कीड रोग व सर्वेक्षण सल्ला प्रकल्प कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येतो. याचाच एक भाग म्हणून मालवण तालुक्यातील आंबेरी येथे महिला शेतकऱ्यांसाठी शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते . या शेतकऱ्यांना काजू लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान अवगत व्हावे यासाठी काजू लागवडीपासून ते काजू प्रक्रियेपर्यंत विविध विषयाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले . तसेच काजू लागवडीसाठी विविध योजना, काजू पीक साठी खत व्यवस्थापन, विविध कीड रोगांचे व्यवस्थापन याबाबत विविध मार्गदर्शक मार्गदर्शन करण्यात आले. ही शेती शाळा एकूण 10 वर्गात घेण्यात येणार असून त्यासाठी 25 महिलांची निवड करण्यात आली.

या शेती शाळेचा शुभारंभ नुकताच तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर यांच्या उपस्थितीत आंबेरी येथे करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांन काजू उत्पादनात येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा करण्यात आली. तसेच काजू लागवडीच्या विविध अनुदानित योजना व जमीन आरोग्य पत्रिका याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ वृंदा केळूसकर, मालवण पंचायत समितीच्या माजी सदस्य सौ श्रद्धा केळूसकर यांचे सह प्रशिक्षणार्थी शेतकरी उपस्थित होते.या शेती शाळेचे आयोजन सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती स्नेहल चौखंडे यांनी केले आहे