दापोली | राकेश कोळी :
हर्णे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा ऐतिहासिक गोवा किल्ला सध्या दुरवस्थेकडे झुकत आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून सुरू केलेल्या डागडुजीच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे वास्तव समोर आले आहे.

मे महिन्यात करण्यात आलेली नवी तटबंदी अवघ्या पहिल्याच पावसात कोसळल्याने किल्ल्याच्या डागडुजीवरील विश्वासच कोसळला आहे. हजारो वर्षे टिकलेली मूळ तटबंदी आजही मजबुतीने उभी आहे, तर काहीच महिन्यांत ढासळलेली नवी तटबंदी हे कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.
या डागडुजीसाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, सहा महिन्यांतच कामाचा फोलपणा समोर आल्याने पुरातत्व विभागाच्या कार्यक्षमतेवरच शंका निर्माण झाली आहे.
या प्रकारामुळे शिवप्रेमी, स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमी संस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, कामाच्या गुणवत्तेची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार, अभियंते आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. काम पूर्ण होण्याआधीच ते ढासळत असेल, तर गोवा किल्ल्याचे भवितव्य काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.













