दापोली Update: गाड्यांची तोडफोड करणाऱ्या तरुणावर गुन्हा

दापोली । प्रतिनिधी : दापोली शहरातील पोस्ट गल्ली परिसरात रविवारी (२ नोव्हेंबर) मध्यरात्री दारूच्या नशेत असलेल्या एका तरुणाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची तोडफोड केली व ४ दुचाकी आडव्या पडून नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी विलोका व्ही. सुमी (वय २० वर्षे, व्यवसाय – नोकरी, रा. पोस्टाची गल्ली, दापोली, ता. दापोली, जि. रत्नागिरी, मुळ रा. इगोटो, ता. सिटीमेड डाउन, जि. किफिरे, राज्य नागालँड) या तरुणास ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाने रात्री सुमारास १ ते ३ दरम्यान रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यांवर मोठे दगड आणि चिरा मारून तोडफोड केली. त्याने योगेश दत्तात्रय वैद्य (वय ५३ वर्षे, व्यवसाय – ज्वेलर्स, रा. पोस्टाची गल्ली, दापोली) यांच्या मालकीच्या मारुती एर्टिगा (क्र. एम.एच.०८ झेड ७१२६) या गाडीच्या काचा फोडल्या. तसेच सुशिल शशिकुमार मिसाळ यांच्या मालकीच्या वॅगनआर (क्र. एम.एच.०८ ए.एन. ४६०३) या कारची समोरील काच, दोन्ही बाजूचे कव्हर, बोनेट आणि स्टिअरिंग भागावर दगड मारून नुकसान केले. या तोडफोडीमुळे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. तसेच येथे उभ्या असलेल्या ४ दुचाकी आडव्याच पडल्या.
घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून संबंधित तरुणास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे . त्याने हे कृत्य नेमके का केले, याचा तपास सुरू आहे. या प्रकारामुळे परिसरातील वाहनमालकांमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्री वाहनं रस्त्यावर पार्क करताना खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. सदर घटनेचा अधिक तपास पो.हेड.काँ. विक्रम बुरोंडकर करीत आहेत.