जनजातीय गौरव वर्ष : 1 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पंधरवडा

 रत्नागिरी:
भारत सरकारने 1 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्ताने जनजातीय गौरव वर्ष उत्सव साजरा करण्यास मान्यता दिली आहे. या उत्सवात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात सामाजिक – आर्थिक विकास आणि जागरुकता, शिक्षण आणि कौशल्य विकास, उपजीविका आणि उद्योजकता, आरोग्य आणि कल्याण, कायदा, संस्कृती आणि वारसा, पायाभूत सुविधांचा विकास तसेच, शासन आणि संस्थात्मक बळकटीकरण करणे याबाबत सुचित केलेले आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत 1 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान पंधरवाडा साजरा करण्याचे केंद्र शासनाने सुचित केल्याप्रमाणे जिल्ह्यात पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. यामध्ये योजनेचे संकल्प याबाबत माहिती देणे, फिल्ड टेस्ट किट (एफटीके) किटद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी, पाणी गुणवत्तेबाबत माहिती देणे, पाणीपट्टी वसुली व देखभाल दुरुस्ती संदर्भात माहिती देऊन गावात शालेय विद्यार्थ्यांमार्फत प्रभात फेरी काढणे, तसेच पाणी वापर व पाणी व्यवस्थापन योजनेची शाश्वततेबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे, मोहिमेदरम्यान राबविण्यात आलेल्या उपक्रमाची सारांश स्वरूपात माहिती देऊन जनजातीय वर्ष अभियानाचा समारोप करण्यात येईल. जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या जनजातीय गौरव पंधरवड्यात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्रीम.वैदेही रानडे यांनी केले.