*गुरख्यांच्या काठ्यांचे केले जाते सामूहिक पूजन
*गावागावातून जपली जातेय जुनी परंपरा
चिपळूण : निसर्ग आणि मानवाचं नातं हे फार जिव्हाळ्याचे आहे. याच निसर्गाच्या वन संपदेत शेतकरी आपली गुर ढोर चारत असतो. जंगलातील वन्य प्राणी यांच्या पासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी तो वनदेवतेला नेहमीच रानात साद घालत असतो. या गुराख्याच्या हातात काठी असते. व काठीला फार महत्व असते. निसर्गाची सुसंगत असणाऱ्या या नातेचा एक सण म्हणजे वाघबारस होय. ही पारंपरिक प्रथा काही गावातून आजही जपली जात आहे. हीच परंपरा आजही बामणोली येथील नवतरुण मित्र मंडळ डिंगणकरवाडी यांनी पारंपारिक पद्धतीने जपली जपले आहे. तुळशी विवाह आणि वाघबारस या पारंपरिक उत्सवाला महत्त्व आहे.
कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी काही गावातून वाघबारस साजरी करण्याची प्रथा आजही आहे. आणि नंतर संध्याकाळी तुळशी विवाह लावले जातात. तर काही गावांमध्ये आधी तुळशी विवाह नंतर वाघ बारस साजरी केली जाते. असे असले तरी सुद्धा निसर्गाशी नातं जपणारा हा वाघ बारस सण जंगलात जाऊन पाणवठा असेल त्या ठिकाणी साजरा केला जातो. ही पारंपरिक प्रथा चिपळूण तालुक्यातील नवतरुण मित्र मंडळ डिंगणकरवाडी या मंडळाने गेली अनेक पिढ्या जपली आहे. या वाडीतील सर्व वाडकरी बंधू घर पट एक पेला तांदूळ आणि काही वर्गणी जमा करून रानात जाऊन भोजन बनवण्यासाठीचे साहित्य जमा केले जाते. त्यानंतर सकाळी लवकर उठून दिंडवणे या ठिकाणी जातात. मात्र आता या भागात जंगल वाढल्याने पाऊलवाटा बंद झाल्या आहेत. त्यामुळे आता ही वाघ बारस श्री पोवारडेबाजी मंदिराच्या तिथे साजरी केला जाते. अशीच वाघ बारस सोमवार दिनांक ३ रोजी साजरी करण्यात आली.

यावेळी वाडीतील सर्व ग्रामस्थांनी सकाळी जाऊन त्या ठिकाणी प्रथम देवळात नारळ वाढवला. त्यानंतर कार्यक्रमाची तयारी सुरू केली. काहींनी भोजनाची तयारी सुरू केली. स्वतः पुरुष मंडळी डाळ, भात आणि खीर बनवतात. देवाला नैवेद्यासाठी पहिल्यांदा ते बनवले जाते. त्यानंतर प्रत्येक गुराखी आपली काठी घेऊन तिला स्वच्छ पाण्याने धुवून सोबत नेतो. या सर्व काठ्यांचे एकत्रित पूजन केले जाते. जे मुले वाघ बनतात. त्यांच्या हस्ते पूजन केले जाते. ही पारंपारिक पद्धत आहे. पाण्यातील रंगीत दगड घेऊन तेच दगडावर घासून रंग तयार केले जातात. आणि वाघांना रंगवले जाते. त्यांनी लाल, पिवळ्या, पांढऱ्या अशा ठिपक्याने त्यांना सजवले जाते. नंतर सर्व पाणवठे त्या सगळ्यांच्या नावाने एक एक नैवेद्यचे पाने भरली जातात. ती पाने वाघांच्या हस्ते ज्या दिशेला पाणवठे आहेत त्या प्रत्येक दिशेला ठेवली जातात. त्यानंतर जंगलातून वाघ शेपटण्यासाठी सर्व गुराखी जातात. जंगलातून वाघ पुढे धावतात आणि पाठवून सर्व गुराखी धावत असतात. “वाघ आला रे.. वाघ आला ..अशा आरोळ्या मोठ्याने देत संपूर्ण रानात आवाज दणाणला जातो. मधेच फटाके वाजवले जातात. त्यानंतर ठराविक सीमेपर्यंत गेल्यानंतर पुन्हा वाघ माघारी फिरतात. पाणवठ्यावर स्नान करून आल्यानंतर गुटख्याच्या काठीला नैवेद्य दाखवल्यानंतर सामूहिक भोजनाचा कार्यक्रम होतो. या दिवसाची गावकरी आणि मुंबईत असलेले बंधूही वाट पाहत असतात. कारण यात एकोपा आणि संस्कृती जतन करण्याची पारंपरिक प्रथा आहे. अशीच वाघ बारस डिंगणकरवाडी येथील ग्रामस्थांनी साजरी करून आपली संस्कृती जतन केली आहे. यावेळी मुंबईतील सुद्धा ग्रामस्थ या सोहळ्यासाठी आवर्जून हजेरी लावतात. राना वनातून फिरताना एक वेगळा भ्रमंतीला आनंद घेता येतो. रानात प्रत्यक्ष जाऊन भोजन करणे आणि त्याचा आस्वाद घेणे हा एक वेगळा अनुभव वाघ बारस पद्धतीमुळे मिळतो.










