सावर्डे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा कोकण विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेत चमकदार यश!

चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठ कोकण झोन विभागांतर्गत दि. ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान डेरवण येथे घेण्यात आलेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालय, सावर्डे या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या स्पर्धेत कु. आदेश अनंत बांद्रे याने गोळाफेक (मुले) व भालाफेक (मुले) या दोन्ही क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक मिळवले, तर कु. ऋतुराज दत्तात्रय नाळे याने 400 मी. डेकॅथलॉन (मुले) या क्रीडा प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले. या दोन्ही खेळाडूंची पुढे होणाऱ्या अंतरविभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी कोकण विभागातर्फे निवड झाली आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य. टी. वाय. कांबळे, तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार मा. शेखर निकम यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. या कामगिरीसाठी क्रीडा विभाग प्रमुख प्रा. संकेत कुरणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्राचार्य. टी. वाय. कांबळे यांचे मनोगत: “विद्यार्थ्यांनी मेहनत, चिकाटी आणि शिस्तीच्या बळावर मिळवलेले हे यश अत्यंत अभिमानास्पद आहे. अशा यशस्वी कामगिरीमुळे महाविद्यालयाचा गौरव वाढला आहे.” संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार मा. शेखर निकम यांचे मनोगत: “विद्यार्थ्यांनी केवळ क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर सर्वांगीण विकासातही पुढाकार घ्यावा. त्यांच्या यशामुळे संपूर्ण संस्थेचा सन्मान वाढला असून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!” विद्यार्थ्यांनी दाखवलेली ही कामगिरी महाविद्यालयासाठी अभिमानास्पद असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व शिक्षक व विद्यार्थीवर्गाकडून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.