स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महापौर, नगराध्यक्ष, जि. प. अध्यक्ष आणि पं. स.सभापती हा महायुतीचाच असणे गरजेचे – भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण

खेड | राकेश कोळी – भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कोकण दौऱ्याचा आज खेडमध्ये जल्लोषात प्रारंभ झाला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पाडल्यानंतर ते स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रात आयोजित भव्य मेळाव्यासाठी दाखल झाले. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर कोकणातील हा पहिला दौरा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि ऊर्जा यांचा संचार दिसून आला.
या दौऱ्यात खेड, चिपळूण आणि रत्नागिरी येथे महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक तसेच मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. येत्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने हा दौरा निर्णायक मानला जात आहे. चव्हाण यांच्या उपस्थितीत मेळाव्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला.
यावेळी वैभव खेडेकर यांच्या सोबत मनसेत विविध जबाबदाऱ्या सांभाळणारे सहकारी तालुकाध्यक्ष निलेश बामणे, ॲड. मिलिंद नांदगावकर, गणेश बेलोसे, राजा जोयसर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यकर्त्यांच्या जयघोषात प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला.
रवींद्र चव्हाण यांनी या प्रवेशाचे स्वागत करताना म्हटले, “ज्या विश्वासाने तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आपण सर्वजण एक कुटुंब म्हणून पक्ष बळकट करण्याचे काम करू.” केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सक्षम सरकार कार्यरत असल्याने पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले की “महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती अध्यक्ष ही पदे महायुतीच्याच ताब्यात असणे आवश्यक आहे. विकासाची गती वाढवायची असेल, नागरिकांच्या समस्या सोडवायच्या असतील तर एक विचार, एक दिशा आणि एक कार्यसंस्कृती गरजेची आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की विकास हा केवळ आश्वासनांनी होत नाही, त्यासाठी स्थिर नेतृत्व, केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय आणि प्रामाणिक अंमलबजावणी आवश्यक आहे.