हर्ने जेटीसाठी माती दगड वाहतूक करणारा डंपर खडकावर आदळून वाळूत रुतला

दापोली l प्रतिनिधी :-तालुक्यातील हर्णे बंदराच्या जेटीसाठी माती दगड वाहतूक करणारा डंपर चालकाच्या बेदरकार चालवण्यामुळे खडकावर आदळून वाळूत रुतल्याने मोठा अपघात झाला.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर डंपरचे मात्र खूप नुकसान झाले आहे.

कित्येक वर्षांनी हर्णे जेट्टीचे काम मंजुरी मिळून कामाला देखील सुरुवात झाली आहे. जेट्टीचे काम करताना कनकदुर्ग किल्ल्याकडून भराव टाकण्यासाठी माती आणि दगड वाहतूक केली जात आहे. ही वाहतूक नवानगर येथून थेट पुळणीवर डंपर उतरवून खडपातून रस्ता काढण्यात आला आहे तेथून थेट किनाऱ्यावरून पुळणीतूनच ज्या ठिकाणी भराव टाकायचा आहे त्या ठिकाणी नेण्याची वाहतूक केली जात आहे.

पावसाळ्याच्या दिवसात किनाऱ्यावर जाणे खूपच धोकादायक असते. कारण पुळण भुसभुशीत झालेली असते. समुद्राला भरती ओहोटी सुरूच असते. समुद्र खवळलेला असतो. अशा परिस्थितीत या पुळणीवरन मोठ्या डंपर ची वाहतूक करणे धोकादायक आहे. असे असताना ४ जूनच्या सायंकाळी एक डंपर याच जेटीसाठी माती आणि दगड घेऊन जात होता. हा डंपर भरधाव वेगात जात होता कारण पुळणीवर कोणत्याही प्रकारचे ट्राफिक नसते. त्यात समुद्राला भरती देखील होती. यावेळी हा डंपर खडकावर आदळून त्याचठिकाणी वाळूत रुतला आणि जोरदार खडकावर आदळल्याने टायर फुटला पुढच्या भागाचे खूप नुकसान झाले. यावेळी चालकाने मद्यपान केले असल्याची माहिती येथील स्थानिकांनी दिली. सायंकाळी वाळूत रुतलेला डंपर रात्री उशिरा १:३० च्या सुमारास मोठ्या क्रेन व दोन जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आला.

एवढी मोठी घटना घडून देखील अजूनही त्याच मार्गे जेटीवर डंपरची वाहतूक सुरूच आहे. हे डंपर अक्षरशः पाण्यातून देखील वाहतूक करत आहेत. हाच प्रकार जर हर्णे च्या मुख्य रस्त्यावर झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता अशी चर्चा ग्रामस्थांमधून केली जात आहे.

______________________

घडलेला प्रकार खूपच धोकादायक आहे. मुख्य रस्त्यावरून तर ही वाहतूक शक्यच नाही. जेट्टीचे काम चालू होतं असतानाच ग्रामपंचायतीकडून शासनाला जेट्टीचे काम करत असताना वाहतुकीकरिता लागणार मार्ग हा स्थानिकांना कोणताही त्रास होऊ नये अशा परिस्थितीत काढावा असे पत्र देखील दिले होते तरीही अजूनही ही अशा प्रकारची वाहतूक सुरू आहे; असे हर्णे ग्रा.पं. सदस्य सना काझी यांनी सांगितले.