भाजप रत्नागिरी उत्तर जिल्हा कार्यकारिणीत निलेश बामणे यांची नियुक्ती

खेड (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी उत्तर जिल्हा कार्यकारिणीत निलेश धोंडू बामणे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खेड शहरातील स्व. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित कार्यकर्ता संवाद मेळावा व पक्ष प्रवेश सोहळ्यात भाजपचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला वैभव खेडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
निलेश बामणे हे पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मात्र, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या बडतर्फीनंतर त्यांनी मनसे पदाचा राजीनामा दिला आणि खेडेकर यांच्यासोबत भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. सध्या ते वेरळ ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणूनही सक्रियपणे कार्यरत आहेत आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत.
नवीन जबाबदारी स्विकारल्यानंतर बामणे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “पक्षाचे ध्येय-धोरण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून संघटना अधिक मजबूत करणे हे माझे प्रमुख ध्येय राहील. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला अधिकाधिक यश मिळावे यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांसह समन्वयाने आणि निष्ठेने काम करणार आहे.”
त्यांच्या नियुक्तीमुळे रत्नागिरी उत्तर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे माजी आमदार सूर्यकांत दळवी शहर प्रमुख अनिकेत कानडे उद्योजक प्रशांत यादव खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर त्यांच्याकडे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.