कमिशनविना रेशन दुकानदारांची दिवाळी झाली ‘कडू’

जिल्ह्यातील दुकानदारांना आश्वासनाप्रमाणे ४ महिन्याचे थकित कमिशन न दिल्याने नाराजी

चिपळूण (प्रतिनिधी):— ‘जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन अद्यापही न मिळाल्याने त्यांची दिवाळी कडू झाली. आहे. यामुळे दुकानदार नाराज असून लवकरच पालकमंत्री उदय सामंत यांसह – पुरवठा विभागाला निवेदन देण्यात येणार – असल्याची माहिती जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, शासन शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या हक्काचे देत असलेले धान्य वाटण्याचे काम जिल्हयातील रेशन दुकानदार प्रामाणिकपणे करीत आहेत. ते करीत असताना शासनाच्या अनेक अटींची पूर्तताही केली जात आहे. असे असताना याच दुकानदारांना त्यांच्या कष्टाचे कमिशन वेळेत मिळत नाही. त्यामुळे दुकानदारांवर उपासमारीची वेळ येत आहे. हा प्रकार संघटनेच्या माध्यमातून आमदार शेखर निकम यांच्यासह लोकप्रतिनिधींपर्यंत पोहचवण्यात आला होता. त्यानुसार आमदार निकम यांनी पुढाकार घेत. काही महिन्यांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घडवून आणली.

यावेळी थकित कमिशन तत्काळ मिळावे, दुकानदारांना २०१४ सालापासून लागू केलेल्या अन्न सुरक्षा कायद्यापासून महागाईप्रमाणे कमिशन वाढ करावी, २०१३ ते २०१८ या कालावधीतील धान्य वाहतुकीच्या फरकाची रक्कम मिळावी, धान्य विक्रीचे कमशिन विक्री होताच मिळावे, अशा अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर केवळ जून महिन्याचें कमिशन देण्यात आले. मात्र जुलैपासून आजपर्यंत कमिशनचा एकही रुपया दिलेला नाही. त्यामुळे दुकानदारांना दिवाळी सणही उत्साहाने साजरा करता आला नाही. त्यामुळे आमचे पैसे देण्यासाठी शासन इतके कठोर का वागते, असा प्रश्न आम्हांला पडला आहे. त्यामुळे आम्ही संघटनेच्या माध्यमातून लवकरच पालकमंत्री सामंत, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देणार असून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, यांचीही भेट घेणार असल्याचे कदम यांनी सांगितले.