त्रिपुरारीच्या चांदण्यात सावंतवाडीकर “हे चांदणे फुलांनी…” मैफिलीने मंत्रमुग्ध

सागर मेस्त्रींच्या विशेष सादरीकरणाने रसिकांची जिंकली मने 

सावंतवाडी । प्रतिनिधी : श्री सद्गगुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच भाजप नेते श्री विशाल प्रभाकर परब यांच्या सहकार्यातून सलग आठव्या वर्षी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘हे चांदणे फुलांनी…. जुन्या-नव्या हिंदी मराठी गीतांचा सदाबहार नजराणा’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जनरल जग्गनाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी येथे आयोजित या मैफिलीने सावंतवाडीकरांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले.

गुरुवर्य श्री निलेश मेस्त्री यांच्या निर्मिती-संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री श्रीपाद चोडणकर, सौ. मंजिरी धोपेश्वरकर, श्री सोमा सावंत व श्री वैभव केंकरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. या कार्यक्रमाला सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी अर्ध्याहून अधिक कार्यक्रमाला हजेरी लावून सर्व कलाकारांना दाद दिली आणि शुभेच्छा दिल्या.

*सागर मेस्त्रींसह कलाकारांची दमदार प्रस्तुती*

या संगीत रजनीचे मुख्य आकर्षण ठरले ते विद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि ‘कलर्स मराठी गौरव महाराष्ट्राचा’ फेम सागर मेस्त्री यांचे विशेष सादरीकरण. त्यांच्यासोबत विद्यालयाच्या सौ. वर्षा देवण-धामापुरकर, ॲड. सिद्धी परब, कु. समृद्धी सावंत, कु. मधुरा खानोलकर, कु. केतकी सावंत, कु. निधी जोशी, श्री. नितिन धामापूरकर आणि कु. भास्कर मेस्त्री या उदयोन्मुख कलाकारांनीही आपली कला सादर केली.

सादर झालेल्या गीतांमध्ये ‘मोसे छल किये जाये’, ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’, ‘प्यार हुआ इकरार हुआ’, ‘सलामे इष्क’, ‘मी वाऱ्याच्या वेगाने आले’, ‘सोचेंगे तुम्हे प्यार’, ‘मल्हार वारी’, ‘प्रीतीच्या चांद राती’ आणि ‘राधा ही बावरी’ यांसारख्या एकापेक्षा एक सरस गीतांचा समावेश होता.

कलाकारांनी आपल्या सुमधुर गायनाने रसिकांना खिळवून ठेवले. तसेच, सौ. पूजा सावंत यांच्या बहारदार नृत्याने कार्यक्रमाला अधिकच रंगत आणली आणि रसिकांकडून ‘वन्स मोअर’ची मागणी मिळवली.

*ताल-सूरांची सुरेख साथ*

कार्यक्रमाला साथसंगत देणाऱ्या वादकांनीही आपल्या कलेतून मैफिलीची रंगत वाढवली. यामध्ये श्री निलेश मेस्त्री (हार्मोनियम), श्री किशोर सावंत व कु. सिद्धेश सावंत (तबला), कु. निरज मिलिंद भोसले (तबला/ढोलक), श्री अश्विन (गुड्डू) जाधव (ऑक्टोपॅड), कु. मंगेश मेस्त्री (सिंथेसायझर) आणि कु. दुर्वा सावंत (गिटार) यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे खुसखुशीत सूत्रसंचालन श्री संजय कात्रे यांनी केले, तर ध्वनी संयोजन श्री सुभाष शिरोडकर यांनी सांभाळले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक श्री सुधीर आडीवरेकर, श्री हेमंत खानोलकर, श्री सोमा सावंत, श्री तानाजी सावंत, कु. गोविंद मळगावकर यांचे विशेष सहकार्य लाभले. मालवणी कवी श्री दादा मडकईकर, डॉ. गोवेकर, श्री विनोद गावकर, श्री सुधीर धुमे, श्री अरुण मेस्त्री, सौ. उत्कर्षां मेस्त्री, श्रीम. मानसी भोसले, डॉ. संगीता तुपकर, सौ. पूजा दळवी, सौ. सरिता सावंत, सौ. अनामिका मेस्त्री यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींनी आणि जिल्हाभरातील संगीतप्रेमी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेवटच्या सादरीकरणापर्यंत कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला. या संगीत सोहळ्याने त्रिपुरारी पौर्णिमेची सायंकाळ सावंतवाडीकरांसाठी अविस्मरणीय ठरवली.