रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे रत्नागिरी शहर अध्यक्ष निलेश भोसले आणि माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी रत्नागिरी नगराध्यक्षपदाची उमेदवारी पक्षाच्याच उमेदवाराला मिळावी, अशी आग्रही मागणी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे.
या मागणीसंदर्भात भोसले आणि कीर यांनी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी रत्नागिरी येथील पक्षाच्या कार्याचा आणि आगामी निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा पक्षाच्या प्रमुख नेत्यांसमोर सादर केला.
रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शहराध्यक्ष निलेश भोसले आणि माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी रत्नागिरीमध्ये पक्षाची स्थिती मजबूत असून, आगामी निवडणुकीत पक्षाचा उमेदवार निश्चितपणे यश मिळवू शकतो, असा विश्वास व्यक्त केला. नगराध्यक्षपदासाठी पक्षाने पूर्ण ताकदीने उतरून लढत द्यावी, यावर त्यांनी भर दिला.
यावेळी हे मान्यवर होते उपस्थित
या महत्त्वाच्या बैठकीला प्रदेश सरचिटणीस श्री. पवार, जिल्हा निरीक्षक बबन कनावजे, आणि महिला जिल्हाध्यक्ष दीपिकाताई कोतवडेकर यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.











