सोनुर्ली माऊलीच्या जत्रोत्सवाला भाविकांची मांदियाळी 

दर्शनासाठी भाविकांच्या रांगा : नवस फेडण्यासाठी गर्दी 

प्रशासन व देवस्थान कमिटीचे सुयोग्य नियोजन 

सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्रातील दक्षिण कोकणचे ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक जत्रौत्सव गुरुवारी भाविकांच्या उपस्थितीत भक्तिपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात सुरू झाला. महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक व गोवा राज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक सोनुर्लीत दाखल झाले होते. दिवसभरात हजारो भक्तांनी देवीचा जयघोष करत माऊलीच्या चरणी लीन होऊन दर्शन घेतले.

*भक्तीमय वातावरणात जत्रोत्सवाचा प्रारंभ*

तब्बल दोन दिवस चालणाऱ्या सोनुर्ली देवी माऊलीच्या जत्रौत्सवाला गुरुवारी पहाटे उत्साहात सुरुवात झाली.

उत्सवमूर्तीवर पहाटे दुग्धाभिषेक आणि विधीवत पूजन झाल्यानंतर देवीचे दर्शन भक्तांसाठी खुले करण्यात आले. सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती, जी दुपारनंतर अधिकच वाढत गेली. सायंकाळी आणि रात्रौ जत्रोत्सवात भाविकांचा जनसागरच उसळला.

आलेल्या भाविकांना रांगेत सोडून देवीचे दर्शन देण्यात आले. ओटी भरणे आणि केळी ठेवण्यासाठी भक्तांची मोठी झुंबड उडाली होती.

जत्रोत्सव उत्साहात आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन, देवस्थान कमिटी आणि स्थानिक भक्त मंडळाने योग्य ते नियोजन केले होते, ज्यामुळे भाविकांना सुलभपणे दर्शन घेणे शक्य झाले. सकाळपासूनच मंदिर परिसरात हजारोंच्या संख्येने भाविकांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळाल्या. भक्तांना उन्हाचा चटका बसू नये यासाठी देवस्थान कमिटीकडून मंडप व्यवस्था करण्यात आली होती.

लोटांगणापूर्वी संपूर्ण दिवसभर माऊलीच्या गाभाऱ्यात ओट्या भरणे आणि केळी ठेवण्याचा कार्यक्रम सुरू होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाचे सावट लक्षात घेऊन देवस्थान कमिटी आणि व्यापाऱ्यांकडून योग्य ते नियोजन करण्यात आले होते.

*मंदिरात फुलांची आरास व विद्युत रोषणाई*

देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण मंदिर उजळून निघाले होते. तसेच, गावात प्रत्येकाच्या घरी करण्यात आलेल्या रोषणाईमुळे सर्वत्र एकप्रकारे नवचैतन्य आले होते.

जत्रोत्सवानिमित्त माऊलीच्या प्रांगणात हॉटेल, विविध दुकाने व इतर स्टॉलही मोठ्या प्रमाणात उभारले गेले होते. केळी, फुले यांचे स्टॉल तसेच कोकणातील सुप्रसिद्ध मालवणी खाज्यांची दुकाने विशेषतः सजली होती.

स्थानिक व्यापाऱ्यांबरोबरच परप्रांतीय व्यापाऱ्यांचीही मोठी गर्दी जत्रोत्सवात दिसून आली. आईस्क्रीम, ज्वेलरी, खेळणी आणि गृहोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली गेली होती. जत्रोत्सवाला आलेल्या भाविकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.

 

*जादा बसेसची सोय*

जत्रोत्सवाकरिता सावंतवाडी एसटी डेपोतून जादा बसेस सोडण्यात आल्यामुळे, भाविक गाड्या कचाकच भरून सोनुर्लीत दाखल होत होते.

 

 

*आमदार दीपक केसरकर यांनी घेतले माऊलीचे दर्शन*

सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांनी श्री देवी माऊलीचे सकाळी दर्शन घेतले. दरवर्षी न चुकता देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या आमदार केसरकर यांचा यावेळी देवस्थान कमिटीकडून यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी सावंतवाडी मतदारसंघातील जनतेसह महाराष्ट्रातील जनतेला सुखी, समाधानी ठेवण्याचे साकडे देवीचरणी घातले आणि उपस्थित भाविकांना जत्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.