आगामी काळात पक्षाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
मनसे पदाधिकाऱ्यांचा निर्धार
चिपळूण (संतोष सावर्डेकर):- गेल्या वर्षभरापासून राज्यात राजकीय उलथापालथ होत असतानाच तर आता मंत्री मंडळ विस्तार या घडामोडी घडत असताना मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी नुकताच रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. चिपळूणमध्ये मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. तर हॉटेल अतिथीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक दृष्टीने आगामी निवडणुकांच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंच्या दौऱ्याने आम्हाला ऊर्जा, प्रेरणा मिळाली आहे. आगामी निवडणुकांत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार, असा निर्धार मनसे प्रदेश सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, जिल्हा सचिव संतोष नलावडे, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू खेतले, चिपळूण तालुकाध्यक्ष विश्वनाथ डोळस, शहराध्यक्ष अभिनव भुरण यांनी बोलतांना व्यक्त केला आहे.
मनसे पक्षाची स्थापना झाल्यापासून रत्नागिरी जिल्ह्यात खेड शहर वगळता मनसेला तितकेसे यश मिळाले नाही किंवा संघटना तितकीशी वाढताना दिसली नाही. परंतु मनसे पदाधिकारी व मनसैनिक पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करीत राहिले. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी प्रसंगी पदांमध्ये फेरबदल केले. यामध्ये महिनाभरापूर्वी चिपळूण तालुकाध्यक्षपदी असलेले अभिनव भुरण यांची चिपळूण शहराध्यक्षपदी तर विश्वनाथ डोळस यांची चिपळूण तालुकाध्यक्षपदी तसेच खेड तालुकाध्यक्षपदी संदीप फडकले यांची निवड केली आहे. गुहागर तालुकाध्यक्षपदी असलेले विनोद जानवलकर यांची उपजिल्हाध्यक्षपदी तर तालुकाध्यक्षपदी सुनील हळदणकर यांची निवड करण्यात आली. काहींवर नव्याने जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आहेत.
गेल्या काही महिन्यात मनसे पक्ष पदाधिकारी व मनसैनिक पक्ष वाढीसाठी झटताना दिसत आहेत. परंतु ही मेहनत कितपत यशस्वी होते. हे आगामी निवडणुकांमध्ये स्पष्ट होणार आहे.
तर आता राज ठाकरे यांचा नुकताच दौरा झाला. यावेळी चिपळुनात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त गर्दी होती. जुने-नवे पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित राहिल्याचे दिसून आले. या सर्वांमध्ये उत्साह होता. या बैठकीत पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पक्ष वाढीसंदर्भात सूचना देतांना तंबी देखील दिली. यामुळे मनसे पदाधिकारी व मनसैनिकांना पक्ष वाढविण्याचे आव्हान असणार आहे. या दौऱ्यांसंदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता या सर्वांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे आम्हाला प्रेरणा, ऊर्जा मिळाली आहे, असे सांगितले.
चौकट-
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा आदेश मानून काम करणार-वैभव खेडेकर
मनसे प्रदेश सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर म्हणाले की, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा दौरा रत्नागिरी जिल्ह्यातील संघटना बांधणीसाठी होता. या दौऱ्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आहे. महाराष्ट्र सैनिकाला ऊर्जा मिळाली आहे. आगामी निवडणुका पूर्ण ताकतीने लढायच्या आणि जिंकायच्या असा कानमंत्र राज ठाकरे यांनी या दौऱ्यात दिला आहे. सातत्याने राज ठाकरे कोकणात दौरा करीत आहेत. याचा अर्थ कोकणामध्ये पक्षाला यश मिळू शकत, याची खात्री ठाकरे यांना आहे. ते लक्ष ठेवून आहेत. गेल्या सहा महिन्यात हा चौथा दौरा आहे. तसेच पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या झाल्या आहेत. नव्या दम्याचे सर्व पदाधिकारी आहेत. यामुळे आगामी निवडणुका ताकदीने लढा स्वबळावर लढा आणि पक्षाला यश द्या, असा कानमंत्र या दौऱ्यात दिलेला आहे. तो आदेश घेवून आम्ही काम करणार आहोत, असा निर्धार वैभव खेडेकर यांनी व्यक्त केला आहे.
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंचा दौरा आम्हाला उर्जात्मक-संतोष नलावडे
मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळाली आहे. आता आम्ही मरगळ झटकून काम करू व आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत यश मिळविण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया मनसे जिल्हा सचिव संतोष नलावडे यांनी दिली आहे.
चौकट
आगामी निवडणुकांत नक्कीच यश संपादन करू- विश्वनाथ डोळस
मनसे चिपळूण तालुका अध्यक्ष विश्वनाथ डोळस यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे तालुकाध्यक्ष म्हणून आपल्याला प्रेरणा मिळाली आहे. जनतेच्या मनात राज ठाकरे राज्याचे नेतृत्व अपेक्षित आहे. या दौऱ्याचा फायदा उठवून चिपळूण तालुक्यात संघटना मजबुतीसाठी प्रयत्न करू तसेच आगामी जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणुकांमध्ये तालुक्यात नक्कीच यश संपादन करून असा विश्वास व्यक्त केला आहे.
चौकट
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंच्या दौऱ्यामुळे उत्साह
मनसे शहराध्यक्ष अभिनव भुरण व मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी म्हटले आहे की, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे आमच्या मध्ये उत्साह निर्माण झाला आहे. पक्ष वाढीबरोबरच आगामी निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी आम्ही मनसे पदाधिकारी व मनसैनिकांना सोबत घेऊन काम करू, अशी ग्वाही दिली आहे.











