प्रत्येक भारतीयांची अस्मिता आणि मनामनात रुजलेले गीत म्हणजे “वंदे मातरम”

फोंडाघाट महाविद्यालयात ‘वंदे मातरम’ गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी —
कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘वंदे मातरम’ या देशभक्तिपर गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्रितपणे ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन केले. या भावस्पर्शी गायनाने परिसर दुमदुमून गेला.

यानंतर इतिहास विभागप्रमुख डॉ. राज ताडेराव यांनी ‘वंदे मातरम’ गीताची निर्मिती, त्यामागील ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि स्वातंत्र्यलढ्यातील या गीताचे योगदान यावर सविस्तर प्रकाश टाकला.अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले, “भारतीय स्वातंत्र्यलढ्यात असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना ऊर्जा आणि प्रेरणा देणारे ‘वंदे मातरम’ हे गीत आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात खोलवर रुजलेले आहे.

वंदे मातरम गीताच्या जागृतीसाठी महाविद्यालयापासून बाजारपेठ मार्गे फोंडाघाट बस स्थानकापर्यंत फेरी काढण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गीतासह वंदे मातरम देशभक्तीच्या घोषणा देऊन आसमंत दुमदुमून सोडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. जगदीश राणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. बाजीराव डफळे यांनी मानले.