दापोली-खेड महामार्गावर BMW कारची रिक्षाला जोरदार धडक; कारचालक फरार

दापोली (प्रतिनिधी) : दापोली-खेड महामार्गावरील टाळ-सुरे शेलारवाडी परिसरात रविवारी (दि. ९ नोव्हेंबर) दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका BMW कारने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा रस्त्याच्या कडेला कलंडली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली. मात्र अपघातानंतर संबंधित कारचालकाने घटनास्थळावर न थांबता पळ काढल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रिक्षाचालक सुचित भाटकर यांच्या सांगण्यानुसार, ते दापोलीकडून खेडच्या दिशेने रिक्षा घेऊन जात होते. त्यावेळी मागून वेगात आलेल्या BMW कारने अचानक रिक्षाला जबर धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की भाटकर काही अंतरावर फेकले गेले. मात्र सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रिक्षा बाजूस करून रस्ता मोकळा केला. दरम्यान, कारचालकाने कोणतीही चौकशी न करता किंवा मदत न देता तातडीने आपली गाडी घेऊन पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पळून गेलेल्या BMW चालकाचा शोध घेतला जात आहे.