२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त.
प्रतिनिधी/रोहन कांबळे
राधानगरी: राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथील विनायक साताप्पा कांबळे याला सापळा रचून १३ मोटरसायकलसह राधानगरी पोलीसांनी अटक केली आहे.राधानगरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल १३ चोरीच्या मोटारसायकलींसह २.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,राधानगरी ट्रॅफिक पोलिस अंमलदार रणधीर वरोटे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून राधानगरी पोलिसांनी तत्काळ तपास पथक तयार केले.सदर पथकाने आरोपी विनायक कांबळे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याच्याकडून कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणांहून चोरी करण्यात आलेल्या अनेक मोटारसायकली हस्तगत करण्यात यश आले. या गाड्यांपैकी काही गाड्यांच्या चोरीचे गुन्हे कोल्हापूर शहरातील अनेक पोलिस ठाण्यात नोंद असल्याचे समोर आले आहे.जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये प्रामुख्याने हिरो होंडा स्प्लेंडर, स्प्लेंडर प्लस, फॅशन प्रो, सुपर स्प्लेंडर अशा विविध प्रकारच्या मोटारसायकलींचा समावेश आहे. आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपी विनायक कांबळे याने कोल्हापूर शहरातील विविध भागांतील वाहनतळांमधून, रस्त्यांवरील वसाहतीतून आणि घरांसमोरून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे. आरोपीवर मोटारसायकल चोरीचे एकूण आठ गुन्हे नोंदवलेले आहेत. पुढील तपास राधानगरी पोलिस करत आहेत.













