पाॅवर लिफ्टींग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतांना पटकावले सुवर्ण पदक
लांजा –: लांजा तालुक्यातील रिंगणे गावची सुकन्या असलेल्या कु.मानसी संजय हांदे हिने राष्ट्रीय पातळीवर संपन्न झालेल्या पाॅवर लिफ्टींग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतांना सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. आपल्या कामगिरीने तीने लांजा तालुक्याचे नाव रोशन केले आहे.
रिंगण गावची सुकन्या असलेली मानसी ही
सध्या मुंबईतील जोगेश्वरी येथील शामनगर येथे तिच्या पालकांसमवेत राहते.तीने झुनझुनवाला महाविद्यालयातून पदवी शिक्षण घेतले असून कबड्डी हा तिचा आवडता खेळ आहे. मात्र कोरोना काळात कबड्डीचा सराव बंद झाल्याने व्यायाम सुरू ठेवण्यासाठी तिने जवळच्याच व्यायाम शाळेत जाणे सुरू केले. तिचा सराव पाॅवर लिफ्टींग खेळास उपयुक्त असल्याचे पाहून व्यवस्थापकांनी तिला तसे मार्गदर्शन सुरु केले. मानसी हिने हा खेळ आत्मसात करीत स्थानिक पातळीवरील अनेक स्पर्धा सहज खिशात घातल्या. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक मिळविल्याने तिला आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा खुणावू लागल्या आहेत.

अशाप्रकारे राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक पटकावणाऱ्या मानसी हांदे हिचे या यशा बद्दल क्रीडा क्षेत्रातून तिचे भरभरून कौतुक होत आहे. या यशाबद्दल राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी तिच्या निवासस्थानी जाऊन तिचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्यांच्यासोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांताराम पाटकर, गणेश चव्हाण व रमेश काटकर हे पदाधिकारी उपस्थित होते.











