खेड : ब्लॅक अँड व्हाईट या साप्ताहिक वृत्तपत्राच्या वतीने राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराचे वितरण सोहळा उत्साहात पार पडला. बातम्यांचे दोन रंग या संकल्पनेतून साप्ताहिक ब्लॅक अँड व्हाईटचे कार्यकारी संपादक विजय यादव यांनी राज्यभरातील गुणवंत शिक्षकांसाठी हा पुरस्कार उपक्रम राबविला असून, यंदा ४० शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या यादीत खेड तालुक्याचा अभिमान वाढवत जिल्हा परिषद शाळा माणी नं. १ येथील पदवीधर शिक्षिका, आदर्श शिक्षिका तसेच कवयित्री म्हणून परिचित असलेल्या दीप्ती दिलीप यादव यांची निवड करण्यात आली.
९ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या या भव्य सन्मान सोहळ्यात उद्योग मैत्रीण संपादिका सारिका भोईटे पवार, विश्वास फाउंडेशनचे अध्यक्ष विनय भोईटे आणि शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप्ती यादव यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दीप्ती दिलीप यादव यांना यापूर्वीही शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यासाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या नावावर कवितांचे लेखन, सांस्कृतिक उपक्रमात सहभाग, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न यामुळे त्या शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. राज्यस्तरावर मिळालेल्या या नव्या सन्मानामुळे त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत असून, खेड तालुका आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागासाठीही हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.










