महामार्गावर उद्भवला बाका प्रसंग; खेड पोलीस आणि स्थानिक तरुणांमुळे धोका टळला

Screenshot

खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर भरणे गावाच्या हद्दीत शनिवारी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एका गायीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ही गाय महामार्गाच्या मध्यभागी पडून राहिल्याने या ठिकाणी पुन्हा गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
घटनेची दखल घेत महामार्गावरून प्रवास करणाऱ्या काही सतर्क तरुणांनी तात्काळ पुढाकार घेत वाहनचालकांना सावध करण्याचे काम सुरू केले. त्यांनी रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना इशारा देत संभाव्य धोका टाळण्याचा प्रयत्न केला. यासोबतच त्यांनी खेड पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी योग्य प्रकारे बॅरिकेटिंग करून वाहतूक सुरक्षित मार्गाने वळवली. पोलीस उपनिरीक्षक समीर सुर्वे, श्री. साळवी व इतर कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीच जेसीबी मशीनची व्यवस्था करून मृत गायीचे अंत्यसंस्कार केले. या संपूर्ण कारवाईमुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान, या घटनेची माहिती महामार्ग पोलीस विभाग, कशेडी यांनाही देण्यात आली होती. मात्र, घटनेनंतर तब्बल तासाभराने महामार्ग पोलीस विभागाचा एक कर्मचारी दुचाकीवरून घटनास्थळी दाखल झाल्याचे समोर आले. अधिक चौकशी केली असता, महामार्ग पोलीसांच्या वाहनासाठी डिझेलची उपलब्धता नसल्याची गंभीर बाब उघड झाली. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक साधनसामग्रीचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले.
सध्या सलग सुट्ट्या, लग्नसराई तसेच शाळांच्या सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. बसेसही पूर्ण क्षमतेने धावत असून वाहतूक दाट झाली आहे. अशा परिस्थितीत खेड पोलिसांनी वेळीच कारवाई केली नसती, तर या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता आली नसती. या घटनेतून खेड पोलिसांची तत्परता आणि नागरिकांची जागरूकता अधोरेखित झाली असली, तरी महामार्ग पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.