घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील पुस्तक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शालेय विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग, वाचनसंस्कृतीला मिळाली नवी चालना
लवेल (प्रतिनिधी) : घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल येथे ३ ते ५ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शन व विक्रीला शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांकडून उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला. विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी खेड तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा तब्बल २५० हून अधिक शाळांमधील सुमारे १२०० ते १३‍०० विद्यार्थी आणि शिक्षक महाविद्यालयात दाखल झाले. या गर्दीचा आणि उत्साहाचा लाभ घेत घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाने बुक लॅण्ड मार्क, चिपळूण यांच्या सहकार्याने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
या प्रदर्शनात विज्ञान, साहित्य, कथा, चरित्र, स्पर्धा परीक्षा, मुलांची पुस्तके अशा विविध विषयांवरील समृद्ध संग्रह मांडण्यात आला होता. विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी पुस्तक प्रदर्शनालाही मोठ्या प्रमाणावर भेट देत पुस्तकांची रुचीपूर्वक पाहणी केली. मोबाईलच्या आकर्षणात अडकलेल्या आजच्या पिढीत वाचनाची गोडी निर्माण व्हावी, पुस्तकांच्या माध्यमातून विचारांना चालना मिळावी आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी, हा मुख्य उद्देश प्रदर्शनामागे होता.

विशेष म्हणजे, पारसी पुस्तकांची विक्री न करता पूर्णपणे सामाजिक बांधिलकी स्वीकारत चिपळूण येथील बुक लॅण्ड मार्कच्या संस्थापिकांनी या उपक्रमात केलेले सहकार्य विशेष कौतुकास्पद ठरले. विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या जवळ आणण्यासाठी आणि वाचनाची नवीन दारे खुली करण्यासाठी केलेला हा प्रयत्न सर्व स्तरातून दाद मिळवणारा ठरला.

या पुस्तक प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी रजिस्ट्रार मा. संदीप मुनघाटे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील आणि प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. पुस्तकप्रेमींनी आणि विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत महाविद्यालय प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले.