चिवेली हायस्कूल, बामणोली, वाघिवरे, बोरगाव, मोरेवाडी कौंढरताम्हाणे शाळांमध्ये वाटप
संतोष कुळे
चिपळूण : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटनेच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कौंढरताम्हाणे, आदर्श विद्यामंदिर चिवेली, जिल्हा परिषद शाळा बामणोली नंबर १, वाघिवरे भोईवाडी शाळा, वाघिवरे कदमवाडी शाळा, बोरगाव मोरेवाडी शाळा नंबर २ आणि जिल्हा परिषद शाळा बोरगाव नंबर १ या शाळांमध्ये संस्थेच्या वतीने वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
तळागाळातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्याकडे जरी गुणवत्ता असली तरी पालकांची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेणे कठीण होते. अशावेळी शिक्षण सुद्धा अर्धवट सोडावे लागते. परंतु आता जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या माध्यमातून अशा सर्व गरजू गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला जात आहे. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, त्याचबरोबर पोलीस अकॅडमी प्रशिक्षण आणि वाचनालय अशा अनेक सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.
त्यांच्या मार्फत आता चिपळूण तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा आणि हायस्कूल येथे मुलांना मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सोमवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने सकाळी ११ वाजता प्रथम जिल्हा परिषद शाळा कौंढर ताम्हाणे या ठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक सुरेश धुमाळ पदवीधर शिक्षक रवींद्र मोहिते त्यानंतर अस्मिता मुंडेकर आणि श्री पाटील यांनी उत्तम सहकार्य केले. संस्थेचे चिपळूण संपर्क प्रमुख म्हणून अनंत डिंगणकर यांनी संस्थेच्या उपक्रमाबाबत माहिती दिली.
यावेळी गावच्या सरपंच मुग्धा गुरव उपस्थित होत्या.
त्यानंतर आदर्श विद्या मंदिर चिवेली या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी बहुसंख्य पालक उपस्थित होते. त्यानंतर जिल्हा परिषद वाघिवरे कदमवाडी आणि भोईवाडी या दोन्ही शाळेत वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. इथेही ग्रामस्थांनी उत्तम प्रकारे सहकार्य केले.
या ठिकाणी सुद्धा अनंत डिंगणकर आणि मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हा परिषद शाळा बामणोली नंबर १ या ठिकाणी सुद्धा दुपारी २.३० वाजता वह्या वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता सुर्वे आणि संपूर्ण शिक्षक वृंद यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर बोरगाव मोरेवाडी या शाळेत सुद्धा सुंदर प्रकारे कार्यक्रम पार पडला. जरी पटसंख्या कमी असली तरी या ठिकाणी महिला वर्ग उपस्थित होता. जिल्हा परिषद शाळा बोरगाव नंबर १ येथे ही वह्या वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. सुंदर नियोजन या शाळेत कार्यक्रमाचे करण्यात आले होते. दिवसभरात एकूण सात शाळांमधील १९५ मुलांना वह्यांचे वाटप संस्थेच्या वतीने करण्यात आले.
संस्थेच्या वतीने अनंत डिंगणकर, ॲड. पत्रकार संतोष भाई कुळे आणि प्रवीण दाते काम पाहिले. सर्व शाळेतील शिक्षक वृंद यांनी उत्तम प्रकारे सहकार्य केले.













