१७ प्रभागांसाठी १९ मतदान केंद्रांची निर्मिती- मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांची माहिती
लांजा : लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून एकूण १७ प्रभागांकरिता एकून १७ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून गोंडेसखल या नवीन मतदान केंद्राची स्थापन करण्यात आली असल्याची माहिती लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लांजा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लांजा नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या दालनात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी माहिती देताना मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार नगरपंचायत कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू झालेली आहे. लांजा नगरपंचायतीच्या १७ प्रभागांसाठी एकूण १९ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यावर्षी गोंडे सखळ या नवीन मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
लांजा नगरपंचायतीचे एकूण मतदार हे १४,२३२ इतके असून संपूर्ण निवडणूक कालावधीमध्ये वेगवेगळे टप्पे हाती घेण्यात आलेले आहेत. पहिला टप्पा हा नामनिर्देशन पत्र दाखल करणे असून दिनांक १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३.०० या वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी आहे .यासाठी शहर परिसरातील सर्व महा-ई-सेवा केंद्रांना आठवड्याचे सातही दिवस केंद्र सुरू ठेवण्याची सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार उमेदवारांना त्या ठिकाणी जाऊन आपली नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत.
या निवडणूक कालावधीमध्ये एस एस टी, एफ एस टी, व्ही व्ही टी आणि व्ही एस टी ही चार पथके महत्वाचे असतात. त्यापैकी एस एस टी आणि एफ एस टी ही दोन पदके कार्यान्वित आहेत. यामध्ये कोर्ले तिठा, कुवे गणपती मंदिर आणि साटवली रोड या ठिकाणी ही एस एस टी ची तीन पथके ठेवलेली असून एकूण नऊ पथके आहेत.
मतमोजणी केंद्र हे लांजा नगरपंचायतीचे बहुउद्देशीय हॉल, लांजा हायस्कूल शेजारी असून त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम देखील तयार केला आहे. पहिल्या मजल्यावर हा स्ट्रॉंग रूम असणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांनी दिली.
तर यावेळी निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी यांनी सांगितले की, एका मतदान केंद्रावर एक ईव्हीएम मशीन देणार असून या निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना संकल्प सिद्धी सभागृहाला या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे. मतदार जनजागृती चा कार्यक्रम देखील होणार असल्याचे निवासी नायब तहसीलदार यांनी सांगितले.












