सल्ला आणि तपासण्या मोफत : लाभ घेण्याचे आवाहन
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट आणि मुंबईतील सुप्रसिद्ध आरजी स्टोन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात १६ नोव्हेंबर रोजी भव्य मोफत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध गंभीर आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला आणि महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या मोफत होणार आहेत. या शिबिराची माहिती पाटणकर एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. रूत्वीज पाटणकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
हे शिबीर १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात संपन्न होणार आहे.
या महा आरोग्य शिबिरात यूरोलॉजी आणि स्त्रीरोगविषयक अनेक आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला दिला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथीचे विकार, पित्तशय खडे, हर्निया, मूळव्याध, ओव्हरीयन सिस्ट (बीजांडकोषातील गाठी), गर्भाशयाच्या गाठी तसेच आहारतज्ञ (Dietician) यांचा सल्ला आदींचा समावेश असेल.
तसेच, शिबिरात नागरिकांसाठी खालील महत्त्वपूर्ण तपासण्या पूर्णतः मोफत उपलब्ध असणार आहेत. यात
नेत्र तपासणी, हिमोग्लोबिन,
रक्त शर्करा, युरोफ्लोमेट्री,
जन्मभूमीतील लोकांसाठी विशेष उपक्रम पत्रकार परिषदेत बोलताना
डॉ. रूत्वीज पाटणकर यांनी या उपक्रमामागील आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, मी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये काम केले आहे आणि आता आरजी स्टोन हॉस्पिटलशी जोडला गेलो आहे. माझ्या जन्मभूमीतील लोकांना चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधांचा लाभ व्हावा, यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत, असं ते म्हणाले.
या शिबिराच्या यशस्वीतेनंतर, सावंतवाडी आणि आसपासच्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची घोषणा डॉ. पाटणकर यांनी केली. आरजी स्टोन हॉस्पिटलच्या माध्यमातून दर रविवारी सावंतवाडीत नियमित ओपीडी बाह्यरुग्ण विभाग देखील सुरु करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला डॉ. पाटणकर यांच्यासह डॉ. भावेश पटेल, ॲड. रूजूल पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. सावंतवाडी तसेच परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.












