रत्नागिरी:
बेदरकारपणे बुलेट दुचाकी चालवून रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात समोरुन येणाऱ्या ॲक्सेस दुचाकीला धडक देत अपघात केला. यात बुलेटवर मागे बसलेल्या दिपक जगन्नाथ शिवलकर (60, रा.मांडवी,रत्नागिरी) या वृध्दाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बुलेट चालकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना गुरुवार 6 नोव्हेंबर रोजी रात्री 8.30 वा.सुमारास मांडवी-सदानंदवाडी येथील रॅम्पपुढील रस्त्यावर घडली.
वैभव हेमंत सुर्वे (32,रा.मांडवी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बुलेट चालकाचे नाव आहे. गुरुवारी रात्री तो आपल्या ताब्यातील बुलेट (एमएच-08-बीएच-7728) वर पाठीमागे दिपक शिवलकर यांना बसवून मांडवी ते मिरकरवाडा रस्त्याने जात होता. तो मांडवी सदानंदवाडी येथील रॅम्प पुढील रस्त्यावर आला असता त्याचा भरधाव बुलेटवरील ताबा सूटला आणि त्याने रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात समोरुन येणाऱ्या ॲक्सेस (एमएच-08-बीडी-4991) ला समोरुन धडक देत अपघात केला. यात ॲक्सेस दुचाकीवरील सौबान नुरुद्दीन जयगडकर (23) आणि समनुन खलील मजगावर (23,दोन्ही रा.पांजरी मोहल्ला,रत्नागिरी) हे जखमी झाले. तर बुलेटवर मागे बसलेल्या दिपक शिवलकर यांचा मृत्यू झाला.











