‘सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी उपक्रम’ रत्नगिरीत देखणेपणाने साजरा

रत्नागिरी :
रत्नागिरीच्या कन्या असलेल्या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व सुनीता ठाकूर अर्थात सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन प्रयोजित आणि आर्ट सर्कल रत्नागिरी आयोजित ‘सुनीताबाई देशपांडे जन्मशताब्दी उपक्रम’ अत्यंत देखणेपणाने पार पडला. या संपूर्ण कार्यक्रमाला माननीय मंत्रीमहोदय आ. उदय सामंत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
उपक्रमाचा प्रारंभ दि. 7 रोजी काव्य अभिवाचन स्पर्धेने झाला. याचे उद्घाटन केले सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि समांतर रंगभूमीच्या चळवळीतील ज्येष्ठ कलाकार शुभांगी दामले यांच्या हस्ते. या दोन्ही स्पर्धा सुनीताबाईंची शाळा असलेल्या पटवर्धन हायस्कूलमध्ये पार पडल्या. या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर मान्यवरांसाह भारत शिक्षण मंडळाचे प्रतिनिधि सुनील तथा दाडा वणजू, शाळेच्या मुख्याध्यापिता श्रीमती घाटविलकर सर्व परीक्षक आणि मेधा गोंधळेकर उपस्थित होत्या. शालेय, महाविद्यालयीन आणि खुला अशा तीन गटात पार पडलेल्या या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित, बालनाट्य चळवळीतील अग्रेसर डॉ. राजेंद्र चव्हाण, अभिनेता स्वानंद देसाई आणि अभिनेत्री मयूरा जोशी यांनी केले. स्पर्धेचा निकल पुढीलप्रमाणे: काव्य अभिवाचन स्पर्धा: शालेय गट: प्रथम- तीर्था दीपक मयेकर, द्वितीय- तीर्था संदीप नाखरेकर, आणि तृतीय- आरोही श्रीकांत पवार
महाविद्यालयीन गट: प्रथम- सेजल भार्गव मेस्त्री, द्वितीय-श्रीया अभिजीत केळकर, तृतीय- आर्या समीर वंडकर
खुला गट: प्रथम- हर्षाली केळकर, द्वितीय- मानसी मंगेश चव्हाण, तृतीय- योगिनी राजाराम भागवत आणि उत्तेजनार्थ पूर्वा मकरंद साने
गद्य अभिवाचन स्पर्धा : शालेय गट: प्रथम- रमा कानविंदे, द्वितीय- प्रत्युष पूर्वा प्रसन्न पेठे आणि तृतीय- स्वराली उमेश टापरे
महाविद्यालयीन गट: प्रथम- आर्या समीर वंडकर, द्वितीय- सिद्धी उदय रानडे, तृतीय- मेघा अविनाश पेंडसे
खुला गट: प्रथम- पूर्वा खालगावकर, द्वितीय- दीप्ती आनंद पंडित, तृतीय- आभा राजेंद्र घाणेकर
यांपैकी पहिल्या दिवशी स्पर्धा संपल्यानंतर शुभांगी दामले यांनी आहे मनोहर तरी मधल्या काही भागाचे अभिवाचन केले. तर दुसऱ्या दिवशी स्पर्धा संपल्यानंतर परीक्षक श्री. वामन पंडित यांनी अभिवाचन करून स्पर्धेची यथायोग्य सांगता केली. यानंतर निकाल लागून स्पर्धा संपली.
दि. 7 रोजी सायंकाळी पु. ल. देशपांडे लिखित मॅड सखाराम आणि मुकेश माचकर लिखित मराठी वाङमयाचा घोळीव इतिहास असे दोन दीर्घांक सादर झाले. या दोन्हीचे दिग्दर्शक होते, मंगेश सातपुते.
दि. ८ रोजी जी. ए. कुलकर्णी आणि सुनीताबाई यांचा पत्राद्वारे झालेल्या संवादाचे अभिवाचन केले लेखिका, गायिका, अभिनेत्री माधुरी पुरंदरे आणि अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी रुंगली रुंगलीयॉट या कार्यक्रमात.
तिसऱ्या दिवशी म्हणजे 9 रोजी दिवसभर कार्यक्रमाची रेलचेल होती. उद्घाटन केले सुप्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी. त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते, पु. ल. देशपांडे यांचा पुतण्या जयंत देशपांडे आणि सुनीताबाईंचा भाचा संतोष ठाकूर. उद्घाटनानंतर लगेच सुप्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले यांनी ‘सुनीताबाई’ या त्यांच्या पुस्तकाच्या अनुषंगाने सुनीताबाईंच्या आयुष्यावर भाषण केले. अगदी अल्प भेटीत भेटलेल्या, पुस्तकांतून भेटलेल्या, विविध स्रोतांमर्फत मिळालेल्या महितीतून कळलेल्या सुनीताबाई, त्यांची कठोर मूल्यनिष्ठा, अचूकपणा, त्याचवेळी त्यांनी निभावलेले गृहिणीपण, कटकसरीमधून पैसे उभे करून लाखोंच्या देणग्या देऊन उभ्या केलेल्या संस्था, त्याबद्दलची सुनीताबाईंची तळमळ, मंगलाताईनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केली.
भाषणानंतर, चिपळूणच्या सांज सोबत या संस्थेला सुनीताबाई-पु. ल. सेवाव्रती सन्मान देऊन गौरवण्यात आले. 25 हजार रुपये रोख आणि पुष्पगुच्छ अशा स्वरूपाचा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर जयंत आणि दीपा देशपांडे यांनी पु. लं. च्या आठवणी, ‘आठवणी भाईकाकांच्या’ या कार्यक्रमातून जागवल्या. सावंतवाडीच्या प्रवीण बांदेकर यांनी सुनीताबाईंच्या आत्मचरित्राचा ऊहापोह करताना, ‘आहे मनोहर तरी- बरंच काही आहे’ या विषयावर व्याख्यान दिले. भोजनानंतर, सुप्रसिद्ध कवी किरण येले यांनी सुनीताबाईंच्या काव्यप्रेमाचा मागोवा आपल्या ‘सुनीताबाईंच्या आत्मचरित्राचे वेगळेपण’ या भाषणातून घेतला. त्यानंतर कौशल इनामदार यांनी ‘कवितेचे विभ्रम- कविता, संगीत आणि अनुभव’ असे सप्रयोग व्याख्यान दिले. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर यांनी ‘आठ आण्यातले लग्न’ या सुनीताबाईंच्या लेखाचे अभिवाचन केले आणि आपल्या आईचे अर्थात गायिका माणिक वर्मा यांचे गीत गाऊन आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यानंतर लेखक, दिग्दर्शक, अभिनेते किरण यज्ञोपवित यांनी ‘सुनीताबाई आणि नाटक’ या विषयामधून सुनीताबाईंची अफाट अभिनय क्षमता, त्यांनी साकारलेल्या भूमिका, अर्ध्यावरून सोडलेले नाटकाचे क्षेत्र याचा मागोवा घेतला. या जन्मशताब्दी उपक्रमाचा समारोप केला, सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांनी. सुनीताबाई हयात असत्या तर त्यांनी वैभव यांच्या कोणत्या धाटणीच्या कविता आवडल्या असत्या अशी त्यांची अभिरूची स्मरून वैभव यांनी कविता सादर केल्या. दिवसभर चाललेल्या सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा, साहित्याचा, विचारांचा जागर त्यांच्याच आवडीच्या सादरीकरणाच्या प्रकाराने झाला.
या तीनही दिवसांमध्ये रसिकांसाठी खुल्या असलेल्या बाळ ठाकूर यांच्या चित्र प्रदर्शनाला आणि पुस्तक विक्रीला उदंड प्रतिसाद मिळाला.
या जन्मशताब्दी वर्षात साहित्याचे विविधांगी कार्यक्रम करण्याचा मानस आहे असे आर्ट सर्कलने या कार्यक्रमात व्यक्त केला