ओंकारला उपचारासाठी वनतारामध्ये नेण्याचे कोल्हापूर सर्किट बेंचचे आदेश

वनताराची टीम दाखल

स्थानिक आक्रमक : इन्सुलीत मोठा पोलीस फौजफाटा तैनात

बांदा : प्रतिनिधी

वाफोली व इन्सुली भागात स्थिरावलेल्या “ओंकार” हत्तीला वनतारामध्ये हलविण्यात यावे असे आदेश आज उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिले आहेत. तत्पूर्वी त्याला १५ दिवस “क्वारंटाईन” करावे व त्यानंतर त्याला वनतारात न्यावे, असे त्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान हे आदेश झाल्यानंतर वनताराची टीम दोन मोठ्या गाड्या घेऊन बांद्यामध्ये दाखल झाली आहे. त्याला पकडण्यासाठी आता प्रयत्न होणार आहेत. तर दुसरीकडे या मोहिमेला विरोध करण्यासाठी ओंकार प्रेमींनी मोठी गर्दी केली आहे. काही झाले तरी आम्ही त्याला वन तारामध्ये न्यायला देणार नाही, असा त्यांचा प्रयास आहे. दरम्यान, घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात असून स्थानिक व वनविभाग कर्मचारी यांच्यात बाचाबाची होण्याचे प्रकार घडलेत.

सावंतवाडी व दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या ओंकार हत्तीला वनतारामध्ये नेण्यात येऊ नये यासाठी रत्नागिरी येथील रोहित कांबळे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यात ओंकारला काही दिवसांसाठी वनतारात नेण्यात यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याच्यावर उपचाराची गरज आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर काही दिवसांनी पुढे काय करावे? याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यासाठी भविष्यात समिती स्थापन करण्यात येणार आहे व त्यानंतर पुढील भूमिका घेण्यात येणार आहे असे म्हटले आहे.

दरम्यान याबाबत याचिकाकर्ते ॲड. केदार लाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली. त्याबाबत ते म्हणाले, रोहित कांबळे यांच्यासह आम्ही त्या ठिकाणी त्याचे तिसरे प्रतिवादी म्हणून हजर झालो होतो. ओंकारला वनतारामध्ये न नेता त्याला नैसर्गिक अधिवासात ठेवण्यात यावे, असे आमचे म्हणणे होते. मात्र न्यायालयाने काही दिवसांकरिता उपचारासाठी वनतारामध्ये नेण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, वनताराची टीम ओंकारला पकडण्यासाठी इन्सुलीत दाखल झाल्याची माहिती मिळताच स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष माजला आहे. ओंकारला वनतारामध्ये न नेता त्याला तिलारी जंगल अधिवासात सोडावे अशी स्थानिकांची आग्रही मागणी आहे. घटनास्थळी शेकडांच्या संख्येने ओंकार प्रेमी दाखल झाले आहेत वनविभाग व पोलीस कर्मचाऱ्यांशी बऱ्याच ठिकाणी स्थानिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झालेल्या पाहायला मिळाल्या. इन्सुलीत अत्यंत तणावाची स्थिती असून मोठा पोलीस फौजफाटा तैनात आहे.