पत्रकार विजय पंढरीनाथ पवार : एक प्रखर, परखड आणि जनतेचा आवाज हरपला

मंडणगड तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात आपले वेगळे आणि ठसठशीत स्थान निर्माण केलेले प्रहार वर्तमान पत्राचे तालुका प्रतिनिधी व मंडणगड पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार विजय पंढरीनाथ पवार यांचे दुःखद निधन ही बातमी समजताच संपूर्ण तालुका शोकाकुल झाला. हे केवळ एका व्यक्तीचे जाणे नाही, तर गावोगावच्या लोकांचे मन मोकळे करून घेणारा, प्रश्नांना आवाज देणारा आणि अन्यायाला भिडणारा निर्भीड पत्रकार हरपल्याची वेदना आहे.
श्री. पवार यांनी २००७ साली दै. तरुण भारत मधून रिपोर्टर म्हणून पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. २००९ साली त्यांनी दैनिक प्रहार मध्ये तालुका प्रतिनिधी म्हणून कामाला सुरुवात केली. गेली तब्बल सतरा वर्षे ते प्रहारचे मंडणगड तालुका प्रतिनिधी म्हणून अत्यंत तत्परतेने व प्रामाणिकपणे कार्यरत होते. ग्रामीण भागातील प्रश्न, अडचणी, तक्रारी आणि विकासाच्या अपेक्षा यांची खरी ओळख करून देणारे पत्रकार विजय पवार हे गावकुसाबाहेर त्यांच्या लेखणीमुळे पोहोचले होते. मंडणगडसारख्या विस्तीर्ण, वेगवेगळ्या भौगोलिक मर्यादांमध्ये विभागलेल्या तालुक्यातून जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी निःस्वार्थीपणे, खडतर परिस्थितीतही त्यांनी केलेले काम मोठे होते. विजय पवार यांची ओळख म्हणजे स्पष्ट वक्तेपणा आणि निर्भीडपणे सत्य मांडण्याची वृत्ती. चुकलेल्या गोष्टींना चूक म्हणण्याचे धैर्य त्यांनी कधीच सोडले नाही. कोणत्याही दबावाखाली न येता “जे चुकीचे आहे ते चुकीचे” हा सरळसोट दृष्टिकोन त्यांनी शेवटपर्यंत जपला. त्यांच्या रोखठोक बोलण्यामध्ये कोणीही दडपण अनुभवत नसे, कारण त्यांच्या वक्तव्यात प्रामाणिकपणा, लोकहिताची भावना आणि खरेपणा असायचा. विजय पवार हे पत्रकार म्हणून जितके सक्षम होते, तितकेच ते सर्व क्षेत्रांमध्ये मानाचे, आदराचे व्यक्तिमत्त्व होते. राजकीय क्षेत्रापासून शैक्षणिक, सामाजिक ते प्रशासनिक वर्तुळापर्यंत त्यांचा सुसंवाद, ओळख आणि विश्वास असे. यासाठीच त्यांच्या जाण्याने फक्त पत्रकारितेचे नाही, तर एका मैत्रीपूर्ण, मदतीला धावून येणाऱ्या समाजपुरुषाचे नुकसान झाल्याची भावना सर्वांच्या मनात आहे. रस्ते, पाण्याची कमतरता, आरोग्यसेवा, शिक्षण, शेतकऱ्यांची संकटे, प्रशासनातील ढोसाळपना या सर्व विषयांवर विजय पवार यांनी सातत्याने लेखन करून अनेकदा प्रत्यक्ष बदल घडवून आणले. पत्रकार म्हणून माझे कामच आहे, काही मोठे केले नाही असे म्हणत ते कधीही श्रेय घेत नसत. पोलीस स्टेशनपासून पंचायत समितीपर्यंत, गावकऱ्यांच्या वेदनांपासून नवीन आशा निर्माण करणाऱ्या तरुणांपर्यंत ते सर्वत्र उपस्थित राहून माहिती घेत आणि अचूकपणे लोकांसमोर ठेवत असत. अचानक झालेले त्यांचे निधन हा धक्का अजून कोणीही सावरू शकलेले नाही. एक विश्वासू पत्रकार, स्पष्ट मतांचा सहकारी, गावोगाव फिरून सत्य मांडणारा निरीक्षक आज शांत झाला आहे. मुळगाव लांजा तालुक्यात असतानाही त्यांनी मंडणगड तालुक्यात स्थिरावून समाजकार्य आणि पत्रकारितेला जीवन समर्पित केले. पत्रकार म्हणून कार्य करताना अनेक अडचणींना धीरोदत्तपणे सामोरे जात त्यांनी समाज, गाव व कुटुंब यांना एकसंध ठेवण्याचा आणि प्रगतीकडे नेण्याचा सतत प्रयत्न केला. पत्रकार विजय पंढरीनाथ पवार यांचे कार्य हे फक्त त्यांच्या कुटुंबाचे नाही, तर संपूर्ण मंडणगड तालुक्याचे अमूल्य योगदान आहे. त्यांच्या निर्भीड लेखणीची, स्पष्ट बोलण्याची आणि माणुसकीने अंगभरून जगण्याची आठवण काळाच्या ओघात अधिकच जाणवत राहील. त्यांच्या पश्चात पत्नी आणि सध्या मुंबई येथे पदवी शिक्षण घेत असलेली मुलगी असा परिवार आहे.