स्थानिक गुन्हे शाखेकडून संगमेश्वर येथील चोरीचा गुन्हा उघड; रायगड जिल्ह्यातील आरोपीला अटक

रत्नागिरी : ​रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. नितीन दत्तात्रय बटाटे व अपर पोलीस अधीक्षक, श्री. बी. बी. महामुनी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) दिलेल्या सूचनेनुसार कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 08/10/2025 ते 09/10/2025 दरम्यान, संगमेश्वर एस.टी. स्टँड जवळील राजेश तुकाराम आंबवकर यांच्या दत्त कृपा मोबाईल शॉपी दुकानातून अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून व शटर उचकटून ₹51,499/- किमतीचा मुद्देमाल (मोबाईल, राऊटर, पॉवर बँक, हेडफोन, स्मार्ट वॉच) चोरला होता, याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मा. पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांनी तपास पथक तयार केले. या पथकाने CCTV फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा शंकर अर्जुन साळुंखे ऊर्फ शंकर अर्जुन पाटील (वय 23, रा. कर्जत, जि. रायगड) याने केल्याचे निष्पन्न केले. गोपनीय माहितीच्या आधारे, पथकाने शहापूर व मुरबाड (जि. ठाणे) येथे शोध घेऊन आरोपी शंकर साळुंखे याला दिनांक 11/11/2025 रोजी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून गुन्ह्यातील ₹18,999/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक चौकशीत त्याने सुमारे 1 महिन्यापूर्वी राजापूर येथून स्प्लेंडर मोटार सायकल चोरी केल्याचीही कबुली दिली असून, त्याबाबत राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी शंकर साळुंखे याच्यावर रायगड व ठाणे जिल्ह्यांमध्ये यापूर्वी चोरी व घरफोडीचे एकूण 3 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीला मा. न्यायालयात हजर केले असता, त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास संगमेश्वर पोलीस ठाणे करत आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पो.हेकॉ. विजय आंबेकर, पो.हेकॉ. विवेक रसाळ, पो.हेकॉ. दिपराज पाटील आणि चा.पो.कॉ. अतुल कांबळे यांनी पार पाडली.