वराड सावरवाड येथील दोन बंद घरे चोरट्यानी फोडली

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वराड सावरवाड येथील दोन बंद घरे मध्यरात्री चोरट्यानी फोडल्याची घटना घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार वराड सावरवाड येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरानजीक गणपत महादेव रावले यांचे घर असून रावले कुटुंबीय मुंबईला स्थायिक असल्याने हे घर बंद असते. या घराचे केअरटेकर विवेक मांजरेकर यांना सकाळी घराच्या पुढील दरवाजाचे कडी कुलूप तोडलेल्या अवस्थेत व दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. याबाबत पोलीसांना माहिती दिल्यावर पोलीसांनी त्याठिकाणी दाखल होत तपासणी केली. मात्र, कोणताही मुद्देमाल चोरीस न गेल्याचे समोर आले. परंतु, काही रक्कम चोरीला गेली असल्याची चर्चा सुरु होती. याच दरम्यान सावरवाड येथीलच श्री सिद्धिविनायक मंदिरानजीक असलेल्या संजय अनंत पारकर यांच्या मालकीच्या बंगल्यातही घरफोडी झाल्याचे केअरटेकर श्री. फाटक यांना दिसून आले. पारकर कुटुंबीय देखील मुंबईला राहत असल्याने हा बंगला बंद होता. पोलीसांनी तेथेही जाऊन पाहणी केली. या पाहणीत घरातील कपाट फोडल्याचे व त्यातील साहित्य इतरत्र टाकल्याचे दिसून आले. मात्र, कोणताही मुद्देमाल चोरीस गेला नसल्याचे सांगण्यात आले.

 

या दोन्ही फरफोडीच्या तपासासाठी फॉरेन्सिक विभाग आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आढाव, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, मालवणचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक श्री. खाडे आदी व इतर उपस्थित होते.