माझे लग्न कधी करणार विचारत मुलाने आईवर विळीने केला वार.

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापुर : कोरोची येथील वैभव गेजगे या मुलाने माझे लग्न कधी करणार या कारणावरून आपल्या जन्मदात्या आईवर विळीने वार केला. या घटनेत आईच्या हाताच्या बोटाचे एक पेर तुटून खाली पडले. जखमी आई सुरेखा दादू गेजगे (वय ४५) यांच्या फिर्यादीवरून वैभव गेजगे (२४, रा. इंदिरा नगर, कोरोची) याला शहापूर पोलिसांनी अटक केली.शहापूर पोलिस ठाण्यात मुलग्यावर गुन्हा दाखल झाला.पोलिसातून मिळालेली माहितीनुसार, सुरेखा या पती, तीन मुले, सुना व नातवंडांसह एकाच घरात राहतात. दुपारी जेवणासाठी सर्वांसोबत बसले असताना वैभव याने माझे लग्न कधी लावणार, या कारणावरून आई सुरेखा यांच्याशी वाद घातला. तसेच त्याने जवळच असलेली कांदा कापण्याची विळी उचलली आणि आईच्या अंगावर झेप घेत तिच्या उजव्या हातावर वार केला. या घटनेनंतर जखमी अवस्थेत सुरेखा यांना कुटुंबीयांनी तत्काळ हातकणंगले येथील खासगी रुग्णालयात उपचार केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.घटनेनंतर मुलगा वैभव हा तेथून पळून गेला होता त्याला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे.पुढील तपास शहापुर पोलिस करत आहेत.