देवरूखात नगरपंचायत निवडणुकीसाठी महायुतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर

सौ. मृणाल शेट्ये यांच्या नावावर शिक्कामोर्तब; ग्रामदेवता सोळजाईचे आशीर्वाद घेवून प्रचाराचा केला शुभारंभ
नगराध्यक्ष पदासह महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील; महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास
देवरूख (प्रतिनिधी)

संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व आरपीआय या पक्षांची भक्कम अशी महायुती झाल्यानंतर महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून सौ. मृणालताई शेट्ये यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. ग्रामदेवता सोळजाईचे आशीर्वाद घेवून महायुतीच्या प्रचाराचा शुक्रवारी शुभारंभही यावेळी करण्यात आला. यावेळी महायुतीकडून जोरदार असे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. नगराध्यक्ष पदासह महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास यावेळी महायुतीच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला.

नगरपरिषद व नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती व महाविकास आघाडी होणार की नाही याबाबत चर्चा सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु सर्वप्रथम देवरुख नगरपंचायतसाठी महायुतीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार नगराध्यक्षपद भाजपकडे देण्यात आले व भाजपच्या मृणालताई शेट्ये यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली. शुक्रवारी सकाळी ११ वाजता देवरुखचे ग्रामदैवत सोळजाई देवी मंदिरात महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले. पाठोपाठ महायुतीचे नेते मंडळी देखील हजर झाले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, भाजप नेते प्रशांत यादव, भाजप पक्ष निरीक्षक अतुल काळसेकर, माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष रोहन बने,शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित,माजी सभापती विलास चाळके,भाजप तालुकाध्यक्ष रुपेश कदम,शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद पवार,भाजप निवडणूक प्रभारी प्रमोद आधटराव,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष हनिफ हरचिरकर, भाजप शहराध्यक्ष सुशांत मुळे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी,महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामदैवत सोळजाई देवीला श्रीफळ अर्पण करून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार व नेत्यांनी आशीर्वाद घेतले. व प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यात सर्वप्रथम देवरुखमध्ये महायुतीची भक्कम एकजूट झाली.हे शुभसंकेत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झालेली गर्दी पाहता महायुतीच्या सर्व उमेदवारांचा विजय आजच निश्चित झाला आहे.परंतु घटक पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी व उमेदवारांनी गाफील न रहाता पुढील प्रत्येक दिवस अहोरात्र मेहनत घ्यावी.प्रत्येक मतदाराच्या घराघरात जा.त्यांचे आशीर्वाद घ्या.आणि आपसातील कोणतेही मतभेद असतील किंवा नाराजी असेल तर पूर्ण बाजूला ठेवून महायुती म्हणून एकत्रितपणे काम करा,असे आवाहन आमदार निरंजन डावखरे,आमदार शेखर निकम,माजी आमदार सुभाष बने,भाजप नेते प्रशांत यादव यांनी उपस्थितांना केले.