रत्नागिरी पोलिसांच्या ताफ्यात अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहन दाखल

वेगावर नियंत्रणासह वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर स्वयंचलित कारवाई होणार
मात्र रस्त्यावरील वेग निश्चिती करणार कोण आणि चालकाना समजणार कसे हा प्रश्न

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यासाठी आलेल्या नवीन इंटरसेप्टर वाहनाचे लोकार्पण आज दिनांक 15/11/2025 रोजी पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथे करण्यात आले. पोलीस अधीक्षक रत्नागिरी नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या शुभ हस्ते या अत्याधुनिक वाहनाचे लोकार्पण झाले.

रत्नागिरी जिल्ह्यात वाहतूक सुरक्षेस बळकटी देणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे व निरपराध लोकांचे प्राण वाचवणे, तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे या उद्देशाने हे नवीन इंटरसेप्टर वाहन रत्नागिरी पोलीस दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आले आहे.

हे इंटरसेप्टर वाहन संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत राहणार असून, विशेषतः राज्य महामार्गावरील वाहतूक नियमांचे काटेकोर पालन होईल याकडे लक्ष पुरवले जाणार आहे. या वाहनाद्वारे महाराष्ट्र शासनाद्वारे निर्धारित करण्यात आलेल्या सर्व वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांवर, सीट बेल्ट न लावणाऱ्यांवर (चारचाकी वाहने), चुकीच्या दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर, तसेच सर्व चारचाकी व जड वाहनांकडून होणारे संबंधित वाहतूक नियमांचे उल्लंघन यावर स्वयंचलित पद्धतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ही दंडात्मक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व तांत्रिक माध्यमातून स्वयंचलित राहणार आहे. महामार्गावरील प्रवासी सुरक्षितता आणि वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हे वाहन महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग, श्री. निलेश माईनकर, पोलीस उपअधीक्षक (मुख्या) श्रीमती. राधिका फडके, पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाणे, श्री. विवेक पाटील, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा, श्री. नितीन भोयर, तसेच मोटार परिवहन विभाग अधिकारी आणि सर्व वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार उपस्थित होते.
या निमित्ताने रत्नागिरी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व महामार्गावर बेफिकीर व वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या सर्व वाहनचालकांसाठी हा स्पष्ट इशारा आहे. नागरिकांनी कृपया वाहतूक नियमांचे पालन करावे व निर्धारित वेगमर्यादेत वाहन चालवून अपघात आणि कायदेशीर कारवाई टाळावी.