दापोली (विशेष प्रतिनिधी) – दापोली पंचायत समितीच्या कृषी अधिकारी श्वेता शिंदे आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी क्रांती माने यांनी आज मंडणगड तालुक्यातील वडवली येथे शेतकरी भावेश कारेकर यांच्या बांबू लागवड प्रकल्पाला भेट देऊन सविस्तर पाहणी केली. बांबू शेतीला आधुनिक पर्याय म्हणून मिळणारी वाढती पसंती आणि त्याचे आर्थिक महत्त्व पाहता कृषी विभागाकडून या क्षेत्रातील उपक्रमांना विशेष प्रोत्साहन दिले जात आहे.
अधिकाऱ्यांनी बांबू लागवडीची पद्धत, व्यवस्थापन, देखभाल आणि बाजारपेठेतील मागणी याबाबत माहिती घेतली. भावेश कारेकर यांनी आपल्या शेतातील बांबू लागवडीचे मॉडेल अधिकाऱ्यांसमोर मांडत स्वतःच्या अनुभवातून आलेल्या अडचणी व उपाययोजनांची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी कारेकर यांच्या कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे भविष्यात शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न मिळू शकते, असे मत व्यक्त केले. यानंतर श्वेता शिंदे व क्रांती माने यांनी दापोली तालुक्यातील मांदिवली गावात शेतकऱ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन सत्र घेतले. या बैठकीत बांबू लागवडीचे फायदे, कमी खर्चातील उत्पादन, जलसंवर्धनातील भूमिका तसेच दीर्घकालीन उत्पन्नाची हमी यावर सविस्तर चर्चा झाली. शासनामार्फत उपलब्ध असलेल्या बांबू लागवड अनुदान योजना, अर्ज प्रक्रिया आणि लाभ मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे याबाबतही शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करत अधिकाऱ्यांनी बांबू लागवडीसाठी अधिकाधिक शेतकरी पुढे यावेत, असे आवाहन केले. कृषी विभागाचा हा उपक्रम शेतकऱ्यांमध्ये बांबू लागवडीबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच त्यांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यावर भर देतो. बांबू शेतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढण्याची आणि या परिसरात नवीन कृषी संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.













