खेडमध्ये सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याची सकारात्मक परंपरा मजबूत

खेड (प्रतिनिधी) : लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने दिलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत खेडमधील तरुणाई सामाजिक जाणिवेतून आपला वाढदिवस साजरा करण्याचा मार्ग निवडत आहे. या उपक्रमाला चालना देत खेडमधील ऐश्वर्या अमित पाटणे यांनी आज त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.

खोपी येथील कार्ड सिद्धेश्वर महाराज संचालित आनंद मठातील मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेत ऐश्वर्या पाटणे यांनी मित्रपरिवारासह आश्रमाला भेट दिली. मुलांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी ठरणाऱ्या विविध जिन्नसांसह आवश्यक साहित्याचे वाटप करून त्यांनी आपला विशेष दिवस अधिक अर्थपूर्ण केला. समाजातील दुर्बल घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेला.

या सामाजिक कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, डॉ. विवेक मोरे, डॉ. तुषार मोरे, शिंदे, अमित पाटणे, लायन आदित्य चिखले, मधुर चिखले, आदेश चिखले आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी ऐश्वर्या पाटणे यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत तरुणांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग घेण्याची गरज अधोरेखित केली.

लायन्स क्लबच्या आवाहनामुळे खेडमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी ही सकारात्मक आणि आदर्शवत परंपरा जोपासली जात असून, सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होत असल्याचे चित्र या उपक्रमातून दिसून येत आहे.