कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड
शिरगाव (प्रतिनिधी) मालवण येथे शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या शासकीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल, शिरगाव येथील १७ वर्षांखालील विद्यार्थिनींच्या संघाने उत्तुंग कामगिरी सादर करत जिल्हा विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात शिरगाव हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी वैभववाडी संघावर २० धावांनी दणदणीत विजय मिळवत कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या उल्लेखनीय यशामागे शिरगाव क्रिकेट अकॅडमीचे मार्गदर्शक शिक्षक श्री. सुधीर साटम व श्री. ए. एम. गर्जे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे संस्था अध्यक्ष श्री. अरुणभाई कर्ले, शाळा समिती चेअरमन श्री. विजयकुमार कदम, मानद अधीक्षक श्री. संदीप साटम, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळा समिती सदस्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजेत्या विद्यार्थिनींच्या संघाचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
तसेच, विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संघाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.












