नगराध्यक्ष पदासाठी आठ तर सदस्य पदासाठी ८२ उमेदवार स्पर्धेत
खेड :
खेड नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून, अखेरच्या दिवसापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकूण आठ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये शिवसेना पक्षाचे 3, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे 2, भाजपचा 1, वंचित बहुजन आघाडीचा 1 आणि 1 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत भाजप–शिवसेना पक्षाची युती जाहीर असतानाही नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे तीन आणि भाजपचा 1 उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. यामध्ये भाजपच्या वैभवी वैभव खेडेकर यांनी भाजपच्या तिकिटासोबतच एक अपक्ष उमेदवारी अर्जही सादर केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, खेड नगरपरिषद सदस्य पदांसाठी देखील शेवटच्या दिवसापर्यंत मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. एकूण ८२ उमेदवारांनी विविध पक्षांतून तसेच अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. त्यापैकी शिवसेना पक्षाचे 27, भाजपचे 15, अपक्ष 15, काँग्रेसचे 4, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 6, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे 2 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे 13 अर्ज दाखल झाले आहेत. खेड नगरपरिषदेमध्ये एकूण 10 प्रभाग असून, या 10 प्रभागामधील 20 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र या 20 जागसाठी शहरातून तब्बल 82 उमेदवार मैदानात उतरणार आहेत. मात्र, यापैकी कोणते उमेदवार अंतिम रित्या स्पर्धेत राहणार हे 21 नोव्हेंबर रोजी छाननी आणि अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीत भाजप–शिवसेना (शिंदे गट) युती प्रत्यक्षात टिकून राहते का? अथवा दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी मात्र या निवडणुकीत एकत्र येत असल्याचे चित्र दिसत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा पक्षांचे संलग्न अस्तित्व यावेळी पाहायला मिळत आहे. तसेच, १५ अपक्ष उमेदवारांची नावनोंदणी झाल्यामुळे या निवडणुकीत स्पर्धा चुरशीची होण्याची चिन्हे दिसत असले तरी 21 नोव्हेंबरनंतर खेड नगरपरिषद निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.











