रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक: नगराध्यक्षपदासाठी ७ महिलांमध्ये चुरस

अपक्षांची गर्दी! एकदम तिकडे झाले पक्ष प्रवेश

रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, यामध्ये मोठी राजकीय चुरस पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्षपदासाठी तब्बल सात प्रमुख महिला उमेदवार रिंगणात उतरल्या आहेत, तर नगरसेवकपदासाठी अपक्ष उमेदवारांनी विक्रमी अर्ज दाखल केल्याने अनेक ठिकाणी प्रमुख पक्षांना कडवी टक्कर मिळण्याची चिन्हे आहेत.

रत्नागिरी नगरपरिषदेचे निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शिवानी माने, संध्या कोसुंबकर, प्राजक्ता किणी, तौफिका मजगावकर, महायुतीकडून शिल्पा सुर्वे, सुष्मिता शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून वहिदा मुर्तुजा या प्रमुख सात महिला उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. ही निवडणूक महिलांच्या नेतृत्वाखालील प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.

नगरसेवकपदासाठी दाखल झालेल्या अर्जांवरून निवडणुकीतील पक्षीय समीकरणे स्पष्ट होत आहेत. अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये अपक्षांची संख्या सर्वाधिक असून ती २८ इतकी आहे. प्रमुख राजकीय पक्षांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वाधिक २१ अर्ज दाखल करत निवडणुकीसाठी जोरदार तयारी दर्शवली आहे. त्या खालोखाल शिवसेनेने १६ उमेदवारांचे अर्ज भरले आहेत. राष्ट्रवादी (अजित दादा गट) १३ अर्जांसह आघाडीवर आहे, तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) ५ उमेदवारांसह रिंगणात आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजपा) ६ अर्ज दाखल केले आहेत, तर काँग्रेस पक्षाने ३ उमेदवारांना संधी दिली आहे. याव्यतिरिक्त प्रहार जनशक्तीने २ आणि बहुजन समाज पक्षाने (बसपा) १ अर्ज दाखल केला आहे.

अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी, आता खरी उत्सुकता अर्ज छाननी आणि माघारीच्या दिवसाकडे लागली आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी झाल्यानंतर किती उमेदवारांचे अर्ज वैध ठरतात, तसेच माघारीच्या दिवशी कोणते उमेदवार रिंगणातून बाहेर पडतात, यावर निवडणुकीचे अंतिम आणि निर्णायक चित्र स्पष्ट होणार आहे. रत्नागिरी नगरपरिषदेवर कोणता पक्ष किंवा गट सत्ता स्थापन करतो, हे पाहण्यासाठी नागरिकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.