खेड (प्रतिनिधी) – खेड व चिपळूण तालुक्यांच्या मधोमध वसलेले चकदेव पठार सध्या ट्रेकर्सचे नवीन आकर्षण ठरत असून हिवाळ्याच्या आगमनानंतर येथे गिर्यारोहकांची पावले अधिक वेगाने वळताना दिसत आहेत. पठारावर असलेली तब्बल ३६ वर्षे जुनी लोखंडी शिडी ट्रेकर्ससाठी आजही तितकीच मजबूत ‘आधारवड’ ठरत आहे. नुकताच डॉ. उपेंद्र तलाठी यांनी तब्बल ४० विद्यार्थ्यांसह या पठारावर ट्रेक करून हा ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा अनुभवला.
सह्याद्रीच्या भव्य पर्वतरांगांसह त्यावर उठून दिसणारी सुळके ही कोकणातील ट्रेकर्ससाठी मोठे आकर्षण ठरत आहेत. त्यामुळे राकट डोंगरमाथे, घनदाट जंगल आणि कोयना खोऱ्याच्या परिसरात ट्रेकर्सची वर्दळ सतत वाढताना दिसते. चकदेव पठार हे यातीलच एक आव्हानात्मक आणि रमणीय ठिकाण. हिवाळ्यात येथील आल्हाददायक वातावरण, डोंगरकड्यावरील वाऱ्याची साद आणि सभोवती दिसणारे कोयना जलाशयाचे अफाट विहंगम दृश्य ट्रेकर्सना येथे खेचून आणते.
शिवसागर जलाशय पसरलेल्या कोयना खांदाटी खोऱ्याचे दृष्य पठारावरून अत्यंत मोहक दिसते. शिवाय सातारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेले हे पठार ऐतिहासिकदृष्ट्याही उल्लेखनीय मानले जाते. जुन्या जाणकारांच्या सांगण्यानुसार शिवकाळात चिपळूणकडे जाण्यासाठी येथे बेलांच्या वेलांपासून तयार केलेल्या जाडजूड शिडीचा वापर होत असे. या मार्गाने ग्रामस्थ बाजारहाटीसाठी चिपळूणला जात होते. मात्र वेलयुक्त शिडीचा धोका लक्षात घेऊन १९९० मध्ये लोखंडी शिडी बसवण्यात आली आणि त्यानंतर या मार्गाने दळणवळण आणि चढाई अधिक सुकर झाली.
आजही तीन दशकांहून अधिक काळ उलटल्यानंतर ही लोखंडी शिडी तितक्याच मजबुतीने उभी असून ट्रेकर्सना चढाईत मोलाची साथ देत आहे. त्यामुळे चकदेव पठार हे ट्रेकिंगच्या दृष्टीने खास ओळख निर्माण करत आहे.
दरम्यान, महिपतगड–सुमारगड–रसाळगड–आंबवली मार्गे चकदेव हे गिर्यारोहकांच्या क्षमतेची खरी परीक्षा घेणारे ट्रेक रूट म्हणून ओळखले जाते. याठिकाणची शिडी अत्यंत जुनी असल्याने तिचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक असल्याचे मत गिर्यारोहक डॉ. उपेंद्र तलाठी यांनी व्यक्त केले. तसेच, चकदेव परिसरात जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून पर्यटनविषयक सुविधा आणि आवश्यक पायाभूत योजनांची अंमलबजावणी झाली, तर स्थानिक ग्रामस्थांना शाश्वत रोजगार उपलब्ध होण्यास मोठी मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. चकदेव पठार पर्यटनाच्या दृष्टीने प्रचंड क्षमता बाळगते; मात्र आवश्यक तेवढा विकास न झाल्याने या भागातील सौंदर्य आणि संधी अजूनही मर्यादित राहिल्या आहेत. ट्रेकर्सची वाढती आवड आणि प्रशासनाचे योग्य नियोजन यातून चकदेव पठार कोकणातील प्रमुख पर्यटनस्थळांच्या यादीत निश्चितच स्थान मिळवू शकते, अशी अपेक्षा गिर्यारोहकांकडून व्यक्त केली जात आहे.










