गणेश मूर्तिकार आबा चव्हाण यांचे निधन! 

मसुरे | प्रतिनिधी :मालवण तालुक्यातील गोळवण सिसेगाळूवाडी येथील रहिवासी तथा प्रसिद्ध गणेश मूर्तिकार चंद्रकांत उर्फ आबा जगन्नाथ चव्हाण (६९) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने रविवारी रात्री राहत्या घरी निधन झाले. चंद्रकांत चव्हाण हे गोळवण दशक्रोशीत आबा या टोपण नावाने परिचित होते. मागील काही वर्षे ते गणपती मूर्तींसाठी लागणारी माती वितरित करीत होते. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात व गोवा राज्यातही त्यांच्याकडील गणपती मातीला मोठी मागणी होती. गोळवण दशक्रोशीत सामाजिक कार्यकर्ते तथा दानशूर व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. गरजवंतांना आपल्याकडून शक्य तेवढी होणारी मदत करण्यात ते नेहमीच पुढे होते. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. गोळवण परिसरात होणाऱ्या सर्व धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्यक्रमात ते नेहमीच सक्रियपणे सहभागी होत होते. आकर्षक गणपती मूर्ती बनविण्याबरोबरच आकर्षक रंगसंगती करण्यात ते तरबेज होते. अजातशत्रू व्यक्तिमत्व व मनमिळावू स्वभावाने ते सर्वांशी परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, बहिणी, भावजई, पुतणे, मेहुणे, भाचे, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. येथील वारकरी सांप्रदायिक तथा पोस्टाचे सेवानिवृत्त कर्मचारी नामदेव चव्हाण, रिक्षा व्यावसायिक तथा भजनी बुवा एकनाथ चव्हाण यांचे ते ज्येष्ठ बंधु तर पोईप ग्रामपंचायतचे सरपंच श्रीधर नाईक व व्यावसायिक मंगेश नाईक यांचे ते भाओजी होत. त्यांच्यावर सोमवारी सकाळी गोळवण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश मूर्तिकार, विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.