लांजा: तालुक्यातील रिंगणे पेडणेकरवाडी येथील श्री हनुमान मंदीरामध्ये शुक्रवार दि. २८ नोव्हेंबर ते रविवार दि. ३० नोव्हेंबर या कालावधीत मंदिर उद्घाटन व मुर्ती प्राण प्रतिस्थापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हनुमान मंदीराचा जिर्णोद्धार करण्यात आला असुन सलग तीन दिवस धार्मिक विधीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० रिंगणे कोंड ते हनुमान मंदिर अशी दौड केली जाईल. त्यानंतर गणेश पूजना पासून पुढे दिवसभर धार्मिक विधी केले जातील. रात्री ९ वा. ह. भ. प श्री. प्रसाद महाराज बडवे यांचे किर्तन व रात्री ११ वा. मधुकर तावडे बुवा (झर्ये) यांचे जागरभजन सादर केले जाणार आहे. शनिवारी दि. २९ रोजी सकाळी ७.३० वा. गणेश पुजनापासुन दिवसभर मुर्ती प्राण प्रतिस्थापनेचे विविध धार्मिक विधी केले जाणार आहेत. रात्री. ९ वा.ह.भ.प अमेय बुवा गुणे यांचे रामदासी किर्तन तर रात्री ११ वा. स्थानिक मंडळाचे जागर भजन होणार आहे. रविवार दि. ३० नोव्हेंबर सकाळी रोजी ७.३० वा शंखनाद, वाद्यसहित शुभारंभ होईल. नंतर श्री हनुमान मंदिर ते श्री राम मंदीर अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर विविध धार्मिक विधींसह ११. वा. सत्यनारायण महापुजा, महिलांसाठी ३ वा. हळदीकुंकू समारंभ ६. वा. ह. भ. प. विजय बुवा पांचाळ यांचे कीर्तन, ८.३० वा. पाहुणे व देणगीदार यांचा सत्कार समारंभ तर रात्री ११. वा. सुधीर बुवा आयरे यांचे संगित भजन सादर केले जाणार आहे.
दरम्यान, सर्वत्र आधुनिक शैलीत मंदिर बांधण्याचा प्रघात पहायला मिळत असताना श्री हनुमान मंदीर ट्रस्टने नवा पायंडा पाडला आहे. ट्रस्टने काळ्या पाषाणात चौथरा व उर्वरित संपुर्ण लाकडाचे मंदिर उभारले आहे. वेगळे व अतिशय विलक्षण देखणे मंदिर साकारल्या बद्दल ट्रस्टचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
दरम्यान, संपूर्ण कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री हनुमान मंदीर ट्रस्ट रिंगणे पेडणेकरवाडी च्यावतीने करण्यात आले आहे.













