वेंगुर्ले :l दाजी नाईक :वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.आज छाननी प्रक्रियेत नगराध्यक्ष पदासाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी २ अर्ज अवैध ठरले. त्यामुळे ६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहे. तर नगरसेवक पदासाठी ११३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननी मध्ये २४ उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने ८९ उमेदवारी अर्ज वैध घोषित करण्यात आले.
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या निवडणूक कक्षात आज निवडणूक निरीक्षक विवेक घोडके यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी उमेदवारांच्या उपस्थितीत दाखल उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी सर्व पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून तसेच काही अपक्षांकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकूण ८ उमेदवारी अर्ज, तर नगरसेवक पदासाठी एकूण ११३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज सकाळी ११ वाजता या अर्जांची छाननी प्रत्येक प्रभाग निहाय करण्यात आली.
छाननी प्रक्रियेत नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या ८ अर्जांपैकी ६ अर्ज वैध ठरले. यामध्ये भाजप चे दिलीप उर्फ राजन गिरप, शिवसेनेचे नागेश उर्फ पिंटू गावडे, काँग्रेसचे विलास गावडे, उबाठा चे संदेश निकम आणि अपक्ष नंदन वेंगुर्लेकर व सोमनाथ टोमके यांचा समावेश आहे. विनायक गवंडळकर आणि बुधाजी येरम यांचे २ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत.
तर नगरसेवक पदासाठी प्राप्त झालेल्या ११३ उमेदवारी अर्जांपैकी २४ उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने ८९ उमेदवारी अर्ज वैध घोषित करण्यात आले. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २१ नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत नेमके किती जण उमेदवारी अर्ज मागे घेतात, यावरून प्रत्येक प्रभागातील लढतीचे चित्र त्यानंतर स्पष्ट होणार आहे.













