करुळ विद्यालयाला 40 हजाराचे क्रीडा साहित्य

भगीरथ प्रतिष्ठान, सेवा सहयोग व ग्रामपंचायतीचे विशेष प्रयत्न

वैभववाडी प्रतिनिधी
भगीरथ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व सेवा सहयोग पुणे यांच्या मार्फत करूळ विद्यालयाला क्रीडा साहित्य पुरविण्यात आले आहे. पुरविण्यात आलेल्या क्रीडा साहित्याचा वापर विद्यार्थ्यांना पुरेपूर होणार आहे. या क्रीडा साहित्याचे उद्घाटन सरपंच नरेंद्र कोलते यांच्या हस्ते पार पडले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत करुळ ग्रामपंचायत यांच्या प्रयत्नाने माध्यमिक विद्यालय करुळ शाळेसाठी साहित्य पुरविण्यात आले आहे. जवळपास 40 हजार किमतीचे साहित्य देण्यात आले आहे. पुरविण्यात आलेल्या क्रीडा साहित्यामध्ये हॉलीबॉल, बुद्धिबळ, कॅरम, रिंग टेनिस, बॅडमिंटन, भाला, लगोरी, दोरी उड्या, वजन काटा आदीचा समावेश आहे.

विद्यालयासाठी आवश्यक क्रीडा साहित्य दिल्याबद्दल भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर तसेच सेवा सहयोगचे करूळ ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक यांनी आभार व्यक्त केले.

उद्घाटन प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक दीपक घाटगे, बांधकाम कमिटी अध्यक्ष बाळा सुतार, सचिव उदय सावंत, शिक्षक विलास गुरव, श्री कानडे, वैभव पाटील, अर्चना पाटील, सौ पाटील, दत्ता पाटील, जगदीश पांचाळ व विद्यार्थी उपस्थित होते.