मळगाव पंचकोशी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे नवीन कार्यालयात स्थलांतर
सावंतवाडी । प्रतिनिधी :
मळगाव पंचकोशी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे नूतन कार्यालयात स्थलांतर करण्यात आले असून, मळगाव कुंभारवाडी येथे या कार्यालयाचा शुभारंभ नुकताच संपन्न झाला. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आयोजित या सोहळ्याचे उद्घाटन मळगावचे सरपंच हनुमंत पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सुनिल राऊळ, ज्येष्ठ विधीज्ञ डि. के. गांवकर, संस्थेचे चेअरमन व्ही. बी. शिरोडकर, व्हाईस चेअरमन श्रीकृष्ण तेली यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सरपंच हनुमंत पेडणेकर यांनी पतसंस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करत संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. फेडरेशनचे अध्यक्ष सुनिल राऊळ म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेल्या २०० छोट्या-मोठ्या पतसंस्था ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. पतसंस्थांची ही चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी फेडरेशनच्या माध्यमातून संचालक आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले जात आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात पतसंस्थांनी अत्याधुनिक साधनांचा वापर करून कारभारात सुसूत्रता आणि पारदर्शकता आणणे तसेच स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी पतसंस्थांनी अधिक प्रभावीपणे काम करणे काळाची गरज आहे. कर्ज वसुलीतील अडचणी दूर करण्यासाठी फेडरेशन वसुली अधिकाऱ्यांच्या माध्यमातून संस्थांना पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.
ज्येष्ठ विधीज्ञ डि. के. गांवकर यांनी संस्थेला आवश्यक असलेल्या कायदेशीर बाबींमध्ये नेहमी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. संस्थेचे चेअरमन श्री. शिरोडकर यांनी सहकार खात्यातील लेखापरीक्षक म्हणून केलेल्या कामाचा अनुभव आणि ज्ञानाचा उपयोग करून संस्थेला आर्थिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हाईस चेअरमन तेली यांनी केले. यावेळी निवृत्त प्रा. ॲड. गणपत शिरोडकर, प्रा. रवी शिरोडकर, चंद्रकांत जाधव यांच्यासह संस्थेचे संचालक मंडळ, ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.













