नगराध्यक्षपदासाठी ३ तर नगरसेवकपदासाठी ६७ उमेदवारांचे अर्ज कायम

नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे एकूण ११ अर्ज बाद

मालवण | प्रतिनिधी : नगरपालिका निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननी मध्ये नगराध्यक्षपदाचे तीन उमेदवारी अर्ज बाद झाले. नगरसेवक पदाचे आठ उमेदवारी अर्ज बाद झाले. यामुळे नगराध्यक्षपदासाठी ३ आणि नगरसेवकपदासाठी ६७ उमेदवारांचे अर्ज कायम राहिले आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठी २१ नोव्हेंबरपर्यंत मुदत असली तरी आजच्या छाननीमध्ये काही उमेदवारांचे डमी अर्ज बाद झाल्याने बहुतांश ठिकाणी तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना पक्षाच्या सौ. ममता वराडकर, भाजपाच्या सौ. शिल्पा खोत, उबाठा पक्षाच्या सौ. पूजा करलकर यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या छाननी मध्ये दोन हरकत नोंदविली होती. यावेळी झालेल्या सुनावणीसाठी दोन्ही बाजुंकडून वकीलांचे पॅनेल उभे करण्यात आले होते. सुमारे दोन तास नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरील हरकतींवर सुनावणी होऊन दोघांच्याही हरकती फेटाळण्यात आल्या. दोन्ही उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. मालवण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी थेट तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र सध्या तरी स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी दाखल करण्यात आलेले इतर तीन उमेदवारी अर्ज यामध्ये अन्वेशा आचरेकर, वैष्णवी मोंडकर, सुरेखा वाळके यांना त्या-त्या पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आले नसल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज बाद ठरले. काही उमेदवारांनी दोन-दोन ठिकाणी अर्ज दाखल केले होते, तर काहींनी अपक्ष आणि राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामुळे छाननीमध्ये डमी दाखल केलेले उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत.